भोरमधील भोरदरा डोंगरांवरील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे 21 पट आणि त्याचे उपप्रकार आढळुन आले आहेत. या प्राचीन खेळाचे अवशेष सापडल्याने पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या आधी पुणे जिल्ह्यात अश्याच प्रकारचे पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावातील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे ३५ पट आणि त्याचे उपप्रकार उजेडात आले होते. नाशिकचे अभ्यासक सोज्वळ साळी यांना हे खडकांवरील पटखेळ आढळून आले आहेत. आतापर्यंत पाताळेश्वर, भाजे, सिंहगड, राजगड, शिवनेरी, जुन्नर येथे काही पटखेळ सापडले आहेत. त्यानंतर वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यास करत असलेल्या सोज्वल साळी यांना मारुंजी येथील टेकडीवर 41 पटखेळ आढळून आले. त्यानंतर कापूरहोळ गावातून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठीच्या मार्गावरील खडकांवर मंकला या खेळाचे 35 पट आणि त्यात वेगवेगळय़ा उपप्रकारांच्या पटांचा शोध लागला आहे. तसेच या ठिकाणच्या खडकांवर पटखेळांसह अन्य आकृत्या, चिन्हे असल्याचे आढळून आले आहे.