सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला.सिगारेट मागितल्याचे निमित्त झाले आणि त्यानंतर पेटलेल्या वादातून कोयत्याने वार करत एका तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
आकाश चौधरी (वय 24, रा.धनकवडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश चौधरी याने दिलेल्या तक्रारीनंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आकाश हा मित्रांसोबत कारमध्ये गप्पा मारत बसला होता. यावेळी आकाश त्याच्या ओळखीचे असलेले तीन तरुण त्या ठिकाणी आले.दरम्यान आकाशच्या एका मित्राने आरोपींकडे सिगारेटची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद झाले आणि त्यांनी आकाशच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आकाश आणि त्याच्या दुसऱ्या एका मित्राने मध्यस्थी करत हा वाद मिटवला आणि त्यानंतर ही सर्व त्या ठिकाणाहून निघून गेले.
दरम्यान, काही वेळानंतर आकाश हा शंकर महाराज वसाहत परिसरात थांबला असताना तीनही आरोपी हॉकीस्टिक आणि कोयता घेऊन आले आणि त्यांनी आकाश याच्यावर हल्ला केला. आकाश याच्या डोक्यात कोणत्याचा वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.