Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत बदल

exam
, शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (12:26 IST)
इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला जाणार असून पॅटर्न बदलले जात आहे. आता वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी आगामी 2024-25 किंवा 2025-26 च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
 
माहितीनुसार आता दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होईल. अर्थात प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांप्रमाणे सहामायी आणि वार्षिक या पद्धतीने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.
 
या परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्या परीक्षांची चिंता असते आणि पालकांनाही काळजी असते. अनेकजण अनुत्तीर्ण झाल्यावर मुलं टोकाचं पाऊल उचलतात किंवा अर्ध्यातूनच शिक्षण सोडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळण्याची गरज असते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. 
 
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर 10 मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागवली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी, असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर लोकांची मते काय आहेत हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन वर्षात ही नवीन पद्धत लागू केली जाणार आहे.
 
नवीन बदलप्रमाणे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच अध्यापन करतील. पण पदवी तथा पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीनेच होतील. पहिले सत्र दिवाळीपूर्वी आणि दुसरे सत्र मार्च महिन्यात होईल. तत्पूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल आणि शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तत्पूर्वी पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

DA महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 1 जुलैपासून 4 टक्के महागाई भत्ता लागू