दिवाळीनंतर पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागली आहे. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये साधारणत: १४ टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. दिवसभरात २ हजार ७४३ जणांची कोरोना चाचणी केली. यापैकी ३८४ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे. १० टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता १३ टक्क्यांच्या आसपास गेला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३९२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २६० जण व्हेंटिलेटरवर आहेत, तर एक हजाराच्या आत आलेली ऑक्सिजनवरील रुग्ण संख्या पुन्हा एक हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यत १ हजार १ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. बुधवारी ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी एकजण पुण्याबाहेरील आहे.