पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. हत्येनंतर मृतदेह हातभट्टीमध्ये टाकून जाळण्यात आला. दृश्यम चित्रपटाप्रमाणे मृतदेहाऐवजी शेळीला कापून तिचे अवशेष गोणीत भरून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बावधन येथे घडली आहे.
विशेष म्हणजे आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपटाशी साधर्म्य असलेली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील बावधन येथे हा प्रकार घडला.
लंकेश सदाशिव रजपूत ऊर्फ लंक्या, गोल्या ऊर्फ अरुण कैलास रजपूत (दोघेही रा. बावधन) आणि सचिन तानाजी रजपूत (वय २५, रा. कासारआंबोली, ता. मुळशी),अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तसेच एका अल्पवयीन मुलासही पोलिसांनी ताब्यात घेतले. भूषण शंकर चोरगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
पोलीसांनी माहितीनुसार बावधन येथील भूषण चोरगे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. महिलेचा नवरा लंकेशला संशय त्यांच्यावर संशय होता. २१ ऑक्टोबरला याच पाश्वभूमीवर वाद झाला आणि पतीने चिडून महिलेला मारहाण सुरु केली. ही मारहाण सुरू असताना त्या महिलेने घरामधून पळ काढला. महिलेशी संपर्क न झाल्याने तिचा प्रियकर असलेला भूषण चोरगे हा महिलेला भेटण्यासाठी घराजवळ आला. त्यावेळी लंकेश व त्याच्या दोन साथीदारांनी धारदार शस्त्राने मारहाण करून भूषणचा खून केला. उरवडे गावात असलेल्या त्याच्या दारूच्या भट्टीमध्ये मृतदेह जाळला.
त्याची राख व इतर अवशेष घोटावडे परिसरातील नदी व नाल्यात टाकून दिले. खुनात सहभागी नसलेला सहकारी सचिन रजपूत याला मयत भूषण चोरगे यांच्या शरीराचे अवशेष एका पोत्यात भरून उरवडे येथील नाल्यात टाकले असल्याचे सांगितले.
भूषण बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या आईने दिली. हिंजवडी पोलिसांना संशयित आरोपी सचिन याच्याकडे चौकशी केली. मुख्य आरोपी लंकेश रजपूत आणि अरुण रजपूत हे मध्य प्रदेशात गेल्याचे त्याने सांगितले, तसेच मृतदेह पोत्यात टाकलेली जागाही दाखविली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पोती ताब्यात घेतली.
मात्र, तपासात त्या पोत्यात शेळीचे अवशेष मिळाले. दृश्यम चित्रपटाप्रमाणे आरोपींनी कट रचल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी मध्य प्रदेशातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सर्व आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी हा घटनाक्रम सांगितला. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.