Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशातील चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील – अजित पवार

देशातील चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील – अजित पवार
, शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (15:15 IST)
देशातील चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील, त्यासाठी कलाकारांना आवश्यक सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बालगंधर्व रंगमंदिरात नाट्यगृह पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रंगभूमी पूजन आणि तिसरी घंटा वाजवून झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, पूजा पवार, जयमाला इनामदार, सुरेश विश्वकर्मा, गिरीश परदेशी, प्रशांत जगताप, लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले,  कोल्हापूर आणि मुंबई येथील चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत आहे. 19 महिने नाट्यगृह बंद राहिल्याने कलावंतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दिवाळीनंतर परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यास नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात येईल.

कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे. एकल कलावंतांना 5 हजार आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील संस्थांना 50 ते 70 हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समितीद्वारे एकल कलावंतांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात अडचणी आल्यास त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.

राज्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राज्याचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनीही या क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. सांस्कृतिक चळवळ अधिक गतीने पुढे नेण्याचे प्रयत्न शासन करीत आहे.

राज्याच्या विकासाचा विचार करताना कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा विचार तेवढाच महत्वाचा आहे. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी एक कुटुंब म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कला क्षेत्रातील व्यक्तींच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले.

यावेळी नागराज मंजुळे, पूजा पवार, जयमाला इनामदार यांनी नाट्यगृह सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. हा कलावंतांसाठी महत्वाचा दिवस असल्याचे मंजुळे म्हणाले.
प्रास्ताविकात मेघराज राजेभोसले म्हणाले, सांस्कृतिक विकासासाठी मोठी तरतूद करून शासनाने कलेला राजाश्रय दिला आहे. त्यामुळे कलाकारांना कौतुकाची थाप मिळेल.प्रारंभी अजित पवार यांनी बालगंधर्व यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले. कार्यक्रमाला नाट्यसृष्टीशी संबंधित कलाकार आणि कलारसिक उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३३ अंतर्गत २५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री