पुण्यातील सर्वात आकर्षक केंद्रांपैकी एक अललेल्या ओशो आंतरराष्ट्रीय मेडिटेशन रिजॉर्ट सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे आश्रमाचा एक भाग विक्री करण्याचा निर्णय घेणं. ज्युरिख स्थित ओशो इटरनॅशनल फाउंडेशननं (ओआयएफ) कोविडच्या प्रादुर्भावाचं कारण देत आर्थिक परिस्थिती बिघडल्याचं सांगितलं आहे. याच फाउंडेशनच्या जवळ कोरेगाव पार्क परिसरात आश्रमाची जागा आहे. त्या दोन प्लॉटची किंमत १०७ कोटी सांगितली जात आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, ओशो रजनीश यांनी स्थापन केलेल्या संप्रदायाच्या मुख्य कार्यालयानं गेल्या वर्षी महामारीमुळे आश्रमातील कार्य स्थगित केले होते. सर्व सुविधायुक्त या आश्रमात जगभरातील श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती योग करण्यासाठी येतात.
फाउंडेशननं १.५ एकरमधील दोन प्लॉट विकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये एक जलतरणतलाव आणि टेनिस कोर्ट आहे. शेजारीच राहणारे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी राजीव बजाज यांना हे दोन्ही प्लॉट विकण्यात येणार आहेत.
ओआयएफ एक धर्मादाय न्यास असून, त्यांनी मुंबईतील धर्मादाय आयुक्त यांना जानेवारीत एक निवेदन देऊन दोन्ही प्लॉट विकण्यासाठी मंजुरी मागितली होती. ओशो यांच्या अनुयायांपैकी एक समूह फेंड्स फाउंडेशनने या विक्रीवर आक्षेप घेतला असून, धर्मादाय आयुक्तांनी समूहाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास मंजुरी दिली आहे.