Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुरुंगातील कैद्यांना वैयक्तिक कर्ज

तुरुंगातील कैद्यांना वैयक्तिक कर्ज
, बुधवार, 30 मार्च 2022 (10:09 IST)
कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांनी केलेल्या कामाकरता मिळणाऱ्या बंदीवेतनातून 'दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँके'मधून 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज 7% इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्याची योजना पुण्यातल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर राबवण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
 
कारागृहातील बंद्यांच्या जीवनमानात सुधारणा आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने गरजेकरता त्यांना कुटुंबीयांसाठी कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. देशामध्ये अशाप्रकारच्या खावटी कर्जाची ही नाविन्यपूर्ण योजना म्हणून पहिलीच योजना असणार आहे.

बंद्याची/कैद्याची कर्ज मर्यादा, शिक्षेचा कालावधी, त्यामधून त्याला मिळू शकणारी संभाव्य सूट, वय, वार्षिक कामाचे अंदाजित दिवस, प्रति दिवसाचं किमान उत्पन्न यानुसार प्रस्तुत कर्जसुविधा ठरविली जाईल. अशा प्रकारच्या कर्जाला जामीनदारांची आवश्यकता असणार नाही. सदर कर्ज हे संबंधित बंद्याला विनातारणी व केवळ व्यक्तीगत हमीवर देण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
 
दरम्यान, या कर्जाच्या रकमेचा उपयोग संबंधित स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी अथवा आपल्या वकीलांची फी देण्यासाठी अथवा इतर कायदेशीर बाबींसाठीच करेल याची दक्षता व जबाबदारी सर्वस्वीपणे कैद्यास कर्ज देण्याऱ्या बँकेची असेल. तसंच बँकेकडून कर्जाच्या परतफेडीमधून वसूल करण्यात येणाऱ्या रकमेच्या 1% इतका वार्षिक निधी कैद्यांच्या 'कल्याण निधी'ला देण्यात येणार आहे.
 
कारागृहामध्ये अनेक बंदी दीर्घमुदतीची शिक्षा भोगत असतात. यातील बहुसंख्य बंदी हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असल्याने अशा बंद्यांना दीर्घकाळ तुरूंगात रहावं लागल्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब हवालदिल होऊन कुटुंबीयांमध्ये औदासिन्य, नैराश्य, अपराधीपणाची जाणीव निर्माण होऊ शकते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकाच घरातून चार मृतदेह सापडले,हत्येचा कट असल्याचा संशय