Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

पिंपरी चिंचवडकोरोना साथीच्या नियंत्रणाबाबत पालिकेची नवीन नियमावली जाहीर, कोणत्या वेळी काय सुरु, काय बंद?

Pimpri Chinchwadkorona
, सोमवार, 29 मार्च 2021 (09:32 IST)
कोरोना साथीच्या नियंत्रणाबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सुधारित आदेश दिले आहेत. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
 
पालिका आयुक्तांनी दिलेल्या सुधारित आदेशात म्हटले आहे की –
 
# सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. न वापरल्यास 500 रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल.
 
# सार्वजनिक ठिकाणी सर्व व्यक्तींनी किमान सहा फुटांचे सामाजिक अंतर राखले पाहिजे. दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची राहील. दुकानात एका वेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नाही.
 
# कामाच्या ठिकाणी सर्व प्रभारी व्यक्ती, कामगारांमध्ये पुरेसे अंतर राखणे, कामाच्या पाळ्यांमध्ये अंतर ठेवणे, दुपारच्या जेवणाच्या वेळी पुरेसे अंतर राखावे.
 
# सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध आहे. उल्लंघन करणाऱ्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल.
 
# सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करण्यास मनाई आहे.
 
# शक्य असेल तोपर्यंत घरातून काम करण्याची पद्धत अनुसरण्यात यावी. कार्यालये, कामाच्या ठिकाणी, दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक, वाणिज्यिक आस्थापना यामध्ये कामाच्या वेळेची सुनियोजित आखणी करावी.
 
# औष्णिक परीक्षण (थर्मल स्क्रीनिंग), हॅन्ड वॉश, सॅनिटायझर हे सर्व प्रवेशद्वाराजवळ, निर्गमनद्वाराजवळ व सामाजिक ठिकाणी लावण्यात यावेत.
 
# कामाच्या ठिकाणी आणि मानवी संपर्कात येणाऱ्या जागा आणि दरवाजांच्या मुठी यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे.
 
# कंटेनमेंट झोन बाबत राज्य शासनाने दिलेल्या आदेशातील अटी पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. या क्षेत्रातील नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
 
# पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 28 मार्च रोजी मध्यरात्री पासून रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. जमावबंदीचे उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाईल.
 
# पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सर्व दुकाने (अत्यावश्यक वस्तू व सेवा, मेडिकल वगळून) हॉटेल, रेस्टोरंट, बार, फूडकोर्ट, सिनेमागृह, नाट्यगृह, प्रेक्षागृह रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत बंद राहतील. हॉटेलमार्फत पार्सल सेवा, घरपोच सेवा सुरु राहील. या आदेशाचा भंग केल्यास केंद्र शासन जोपर्यंत कोविड 19 आपत्ती पूर्णपणे संपली, असे जाहीर करीत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येईल. तसेच अन्य कारवाई देखील केली जाईल.
# सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, संमेलने यांना पूर्णतः प्रतिबंध राहील. भूमी पूजन, उद्घाटन आणि तत्सम लोक एकत्र येऊ शकतील अशा कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. नाट्यगृह, प्रेक्षागृहातही असे कार्यक्रम करण्यास परवानगी नाही.
 
# लग्न समारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करावा. 50 पेक्षा अधिक लोक आढळले तसेच नियमांचे उल्लंघन झाले तर संबंधित आस्थापना केंद्र शासन जोपर्यंत कोविड 19 आपत्ती पूर्णपणे संपली, असे जाहीर करीत नाही तोपर्यंत बंद केली जाईल.
 
# अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडित कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करावेत.
 
# पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व उद्याने पूर्णतः बंद राहतील.
 
# सहाय्यक आयुक्त / क्षेत्रीय अधिकारी, झोनल अधिकारी यांना होम आयसोलेशन बाबत नागरिकांनी संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. होम आयसोलेशनमध्ये असताना घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांची माहिती देखील संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला देणे आवश्यक आहे.
 
# कोविड पॉझिटिव्ह झाल्यापासून रुग्णाच्या दरवाजावर 14 दिवसांचा विलगीकरण कालावधी दर्शवणारा फलक लावण्यात येईल.
 
# पॉझिटिव्ह रुग्णांच्या हातावर शिक्का मारला जाईल. पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील नातेवाईकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. आवश्यक असल्यास मास्क लावून घराबाहेर पडावे.
 
# होम आयसोलेशनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णास तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.
 
# महापालिका हद्दीतील सर्व खाजगी कार्यालये (वैद्यकीय, आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) 50 टक्के मनुष्यबळासह सुरु ठेवता येतील. उत्पादन क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरु ठेवता येईल. कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. कामाचे शिफ्टमध्ये नियोजन करावे.
 
# शासकीय कार्यालयात अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास नागरिकांना बंदी आहे. बैठकीसाठी निमंत्रिक केलेल्या नागरिकांना संबंधित कार्यालय प्रमुखांच्या प्रवेश पत्राने येता येईल.
 
# सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखावे. संबंधित ट्रस्टने ऑनलाईन पासची व्यवस्था करावी.
 
# सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. नियमांचा भंग झाल्यास 500 रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बारामतीत लसीकरण केंद्र वाढवणार