Pune: पुण्यातील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांना कारगिल येथे देशसेवेचे कर्तव्य बजावताना 3 सप्टेंबर रोजी वीर मरण आले. 94 मीडियम रेजिमेंट आर्टिलरीमध्ये सेवेत असलेले पुण्यातील जवान दिलीप बाबासाहेब ओझरकर हे कारगिल ते लेह प्रवास करताना शत्रूच्या हल्ल्यात शहीद झाले. ते भवानी पेठ पुणे येथे राहत होते. दिलीप ओझरकर हे 2004 मध्ये लष्करी सेवेत दाखल झाले असून सध्या 94 मिडीयम रेजिमेंट आर्टिलरी येथे हवालदार पदावर असून देशसेवेचे कर्तव्य बजावत होते.
त्यांचे पार्थिव सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या लोहगाव विमानतळावर आणण्यात आले
त्यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅंटोन्मेंट स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. या वेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फेरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून त्यांना मानवंदना दिली. शहीद दिलीप ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर आणि लहान मुलाने पार्थिवाला मुखाग्नी दिली. दिलीप यांच्या निधनाने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.