पुण्यात एका नर्सच्या वेशेतील महिलेने तीन महिन्यांच्या चिमुकलीला ससून रूग्णलायतून पळवून नेले होते. मात्र, अवघ्या काही तासांतच पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आणि त्या चिमुकलीची त्या महिलेच्या तावडीतून सुटका करत, तिच्या आईकडे सोपवले. आरोपी महिला उच्चशिक्षित असून तिला अनेक वर्षापासून मूल होत नव्हते. यातून तिने मुलीला पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे. वंदना जेठे (रा. खराडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात कासेवाडी भागात राहणारी एक महिला तिच्या तीन महिन्याच्या मुलीसह एका मैत्रिणीसोबत आली होती. तेव्हा त्या महिलेसोबत असलेली मैत्रीण काही कामानिमित्त बाहेर गेली. त्यानंतर काही मिनिटांनी आरोपी वंदना ही नर्सच्या वेशात त्या महिलेकडे गेली आणि म्हणाली की, तुम्हाला बाहेर त्यांनी बोलावले आहे, मी बाळाला सांभाळते. नर्स असल्याने त्या महिलेने विश्वासाने मुलीला आरोपी महिलेकडे दिले. काही मिनिटांनी त्या मुलीची आई ज्या महिलेकडे आपण मुलीला दिले. तिथे परत आली असता ती आरोपी महिला कुठेही दिसत नव्हती. यावतर तत्काळ तेथील सुरक्षारक्षक आणि पोलिसांना माहिती दिली गेली. त्यानंतर सीसीटीव्हीत तपासणी केली गेली. त्यामध्ये आरोपी महिला रुग्णालयाच्या बाहेरील एका रिक्षात मुलीला घेऊन बसताना दिसली.
त्यानंतर तेथील रिक्षावाल्यांना याबाबत विचारणा केल्यावर, ज्या रिक्षात आरोपी महिला गेली होती. तो रिक्षावाला एकाचा मित्र असल्याचे समजले. त्या मित्राने आरोपी महिला ज्या रिक्षात बसली होती. त्याला फोनवर घटनेबाबत थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर रिक्षाचालकाने आरोपी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि यानंतर आरोपी वंदना हिला चंदननगर येथून अथक प्रयत्नानंतर ताब्यात घेण्यात आले.