Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंधुताई सपकाळ यांचं निधन, पुण्यामध्ये सुरू होते उपचार

सिंधुताई सपकाळ यांचं निधन, पुण्यामध्ये सुरू होते उपचार
, मंगळवार, 4 जानेवारी 2022 (22:45 IST)
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यात निधन झालंय. त्यांच्यावर गेले काही दिवस पुण्यात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
2021मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव केला होता.
 
"माझं माईंसोबत 2 दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, मी व्यवस्थित घरी येणार आहे म्हणून. आणि आज हे असं झालं," सिंधूताई सपकाळ यांच्या मानसकन्या किर्ती वैराळकर यांनी हे सांगितलं.
सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी 'ममता बाल सदन' नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या 'अनाथांची माय' म्हणून परिचित झाल्या.
पुण्यातल्या गॅलक्सी केअर हॉस्पिटलमध्ये सिंधुताईंवर उपचार सुरू होते. मंगळवारी (4 जानेवारी) रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितलं.
 
पद्मश्री पुरस्काराने सन्मान
सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत होत्या. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई 'मी हजारहून अधिक मुलांची आई आहे' असं अभिमानाने सांगत.
 
सिंधुताई सपकाळ यांना गेल्या वर्षीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अनाथ लेकरांची आई म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असलेल्या सिंधुताईंचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळ याचं वक्तृत्वावरही चांगलं प्रभुत्व होतं. कार्यक्रमांमध्ये त्यांना ऐकण्यासाठी अनेकदा मोठी गर्दी जमायची. त्यांना माई म्हणून ओळखलं जात होतं. भाषणांदरम्यान स्वतःच्या जीवनाची कर्मकहाणी सांगतानाच अस्खलित ऊर्दूतील शेर आणि मराठी कवितांच्या ओळी यांच्या माध्यमातून त्या मनं जिंकून घेत.
चित्रपटाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचला संघर्ष
सिंधुताई सपकाळ यांना शिक्षणाची आवड होती. तरी त्यांना शिकता आलं नव्हतं. बालपणी आलेल्या अनुभवांमुळं अनाथ मुलांच्या जीवनातील संघर्ष कमी करण्यासाठी त्यांनी एक संस्था सुरू केली होती.
 
पुण्यातील पुरंदर येथील कुंभारवळण याठिकाणी असलेल्या ममता बाल सदन या संस्थेच्या माध्यमातून सिंधुताई अनाथ आणि गरजू मुलांना मदतीचा हात देत होत्या.
 
संस्थेच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा उद्देश होता. त्यासाठी सर्वप्रकारची मदत संस्थेतर्फे केली जात होती.
 
या संस्थेच्या माध्यमातून एक हजारपेक्षा अधिक मुलांना त्यांनी मदत केली होती.
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवासावर 'मी सिंधुताई सपकाळ' हा चित्रपटही तयार झाला होता. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष याद्वारे मांडला होता.
 
या चित्रपटात तेजस्विनी पंडित यांनी तरुणपणातील सिंधुताई आणि ज्योती चांदेकर यांनी वृद्ध सिंधुताईंची म्हणजे माईंची भूमिका केली होती.
 
सिंधुताई यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगितली होती

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन