Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंहगडः महंमद तुघलक ते शिवाजी महाराज; काय आहे कोंढाण्याचा इतिहास?

sinhagad fort
, शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (11:31 IST)
- ओंकार करंबेळकर
महाराष्ट्र आणि किल्ल्यांचं नातं कोणत्याही मराठी माणसाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. सह्याद्रीच्या रांगांतील अनेक किल्ल्यांचा इतिहास आपण वेळोवेळी वाचत, शिकत आलेलो आहोत. विशेषचः छ. शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतरच्या काळातल या किल्ल्यांसंदर्भातलाा इतिहास आपल्याला विशेष माहिती असतो.
 
छ. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचं महत्त्व ओळखलं होतं. त्यांनी आज्ञापत्रात म्हटलं होतं, ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय. प्रजा भग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावरी राज्य ऐसे कोणास म्हणावे... हे राज्य तरी तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामीनी गडावरुनच निर्माण केले.’ यावरुन त्या काळात किल्ले-गडांना असलेलं महत्त्व दिसून येतं.
 
प्रत्येक किल्ल्यावर हवालदार, सरनोबत, सबनीस, कारखानीस, मुजुमदार, सरनोबत, कारकून, नाईक, तिरंदाज आणि इतर मावळे ठेवलेले असत. किल्ल्यांच्या डागडुजीकडे विशेष लक्ष दिलेलं असे.
 
अनेक किल्ल्यांची शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांशी आलेल्या संबंधामुळे आपल्याला माहिती असते. जसं की सिद्दीच्या वेढ्यामुळे पन्हाळगड, राज्याभिषेकामुळे रायगड असे.
 
तशाच प्रकारे तान्हाजी मालुसरे यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे आपल्याला सिंहगड किंवा कोंढाण्याचं नाव माहिती असतं. पुण्याच्या जवळ असल्यामुळे या गडावर सहज जाताही येतं. याच गडाची आपण येथे माहिती घेणार आहोत.
 
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून साधारणपणे 20किमी अंतरावर नैऋत्येला आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1400 मी इतकी आहे. त्याला कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा असे दरवाजे आहेत. गडावरती पाण्याची टाकं असून त्यातलं देव टाके, गणेश आणि राजाराम टाकं जास्त प्रसिद्ध आहेत.
 
इतिहास
कोंढाणा म्हणजेच सिंहगडाचा इतिहास सुमारे 14 व्या शतकापासूनचा असल्याचं दिसतं. याला कोंडाणे, कोंढाणे, कोंढाणा, सिंहगड, कुंधियाना, कौंधाना, बक्षिंदाबक्ष अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या कालखंडात संबोधलं गेलं आहे. त्यातील कोंढाणा आणि सिंहगड ही नावं जास्त प्रचलित आहेत. बक्षिंदाबक्ष हे नाव औरंगजेबानं ठेवलेलं आहे.
 
महंमद तुघलकाने 14 व्या शतकात हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख असून त्यानंतर तो निजामशाहीत होता. त्यानंतर तो विजापूरच्या आदिलशहाकडे गेला.
 
शहाजी महाराजांनी 1638 साली कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार म्हणून दादोजी कोंडदेव यांना नेमलं. ते 1645 पर्यंत हे काम पाहात होते.
 
1646 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहाच्या तावडीतून सोडवून जिंकून घेतला. मात्र 3 वर्षांनी शहाजी महाराजांनी आदिलशहाने कैद केल्यावर हा किल्ला त्यांना सोडून द्यावा लागला.
 
शेवटी 1656 साली हा किल्ला पुन्हा जिंकून घेतल्यावर त्याचं सिंहगड असं नामकरण त्यांनी केलं.
 
1665 साली मिर्झाराजे जयसिंहांच्या वेढ्यामुळे आणि औरंगजेबाशी झालेल्या पुरंदरच्या तहामुळे शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यामध्ये सिंहगडाचाही समावेश होता.
 
त्यामुळे किल्ल्याचा ताबा पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या हातून गेला.
 
सिंहगडाची लढाई
पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांना आग्र्याला जावे लागले. आग्र्याला औरंगजेबाच्या तावडीतून सुटून येण्याचं अद्भूत काम त्यांच्या हातून झाले. त्यानंतर त्यांनी आपले गेलेले एकेक किल्ले परत घ्यायला सुरुवात केली.
 
1670 साली सिंहगडाची लढाई झाली. तान्हाजी मालुसरे, त्यांचे भाऊ सूर्याजी यांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
 
या लढाईचं वर्णन डॉ. लहू कचरू गायकवाड यांनी आपल्या शोधनिबंधात केले आहे. डॉ. गायकवाड यांनी सिंहगड किल्ल्याचा इतिहास हा शोधनिबंध सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात सादर केला आहे. त्यातील माहिती येथे पाहू
 
सिंहगडावरती मुघलांनी उदयभानू राठोड या रजपूत किल्लेदारास नेमलं होतं. तान्हाजी मालुसरे हे मुळचे जावळी तालुक्यातल्या गोडोली गावचे, त्यानंतर ते महाडजवळ उमरठ येथे स्थायिक झाले. त्यांना सिंहगडाच्या परिसराची चांगली कल्पना होती. तान्हाजी, सूर्याजी आणि पाचशे मावळे सिंहगडाच्या लढाईसाठी सिद्ध झाले.
 
त्यांनी गडाच्या कलावंतिण बुरूज आणि झुंजार बुरुज यांच्यामध्ये असलेल्या तटावरुन चढाई करण्याचा निर्णय घेतला.
 
4 फेब्रुवारी 1670च्या रात्री त्यांनी राजगडावरुन सिंहगडाकडे कूच केलं. सिंहगडाजवळच्या जंगलातून अंधारातच मार्गक्रमण करत ते गडाच्या पायध्याला आले. कड्यावर मावळे चढून त्यांनी इतरांना दोरावरुन वरती घेतलं. साधारणतः तीनशे मावळे गडावर चढले. मात्र याची कुणकुण पहारेकऱ्यांना लागल्यावर गडावरचे सर्व लोक जागे झाले. मुघलांचे पंधराशे सैनिक आणि या तीनशे मावळ्यांमध्ये घनघोर युद्ध झालं.
 
तान्हाजी आणि उदयभानूही एकमेकांना भिडले मात्र यात तान्हाजी यांचा मृत्यू झाला. पाठोपाठ जखमी झालेल्या उदयभानूचाही यात मृत्यू झाला. तान्हाजींनी प्राण सोडल्यावर सूर्याजी यांनी सगळी सूत्रं हाती घेतली आणि लढाई चालू ठेवली आणि सिंहगड काबीज केला. गडावरील गवत साठवण्याच्या जागा पेटवून दिल्या आणि ही बातमी राजगडावर शिवाजी महाराजांना समजली.
 
तान्हाजी मालुसरे यांचं शव राजगड मार्गे पोलादपूरला नेऊन तेथे उमरठ या त्यांच्या गावी नेण्यात आलं. तिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
छ. शिवाजी महाराजांनंतर सिंहगड
1680 साली छ. शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज राज्यकारभार पाहू लागले. 1689 साली औरंगजेबाच्या कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शाहू यांनाही औरंगजेबाने कैद केलं होतं.
 
या काळात औरंगजेबाने मराठी साम्राज्यातील अनेक किल्ले ताब्यात घेतले त्यात सिंहगडही होता. 1693 साली नावजी बलकवडे यांनी तो पुन्हा जिंकून घेतला.
 
संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तामिळनाडूत जिंजी इथल्या मराठी स्वराज्याच्या मुलखात गेले.
 
तेथून ते महाराष्ट्र आणि जिंजीचा कारभार रामचंद्र पंत अमात्य बावडेकर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्या सहाय्याने चालवत होते.
 
तेथे 8 वर्षे राज्यकारभार केल्यानंतर 1698 साली ते महाराष्ट्रात परत आले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत 1700 पर्यंत ते महाराष्ट्रातच होते. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांचा सिंहगडावर निधन झालं.
 
त्यानंतर 1702 साली औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेण्याचा आदेश झुल्फिकारखानास दिला. औरंगजेबाने सिंहगडाच्या वेढ्याकडे स्वतः लक्ष दिलं. मात्र या वेढा आणि गडावरच्या मावळ्यांशी अनेक लहान-मोठ्या चकमकी होऊनही तो दीर्घकाळ त्याच्या हातात आला नाही. कोंढाणा किल्ला ताब्यात यावा यासाठी औरंगजेब बादशहानं जातीनं लक्ष घातलेलं दिसतं. किल्ला ताब्यात घेण्यासाठी होत असलेल्या प्रत्येक हालचालीची खबर तो घेई आणि मार्गदर्शनही करे.
 
अखेर एप्रिल 1702मध्ये हा किल्ला औरंगजेबाकडे गेला आणि त्याचं नाव बक्षिंदाबक्ष असं केलं. असं असलं तरी 1705 साली तो काही काळासाठी मराठ्यांनी जिंकून घेतला होता. मात्र त्यानंतर पुढच्याच वर्षी औरंगजेबाने जिंकून घेतला.
 
1707 साली औरंगजेब बादशहाचं निधन झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली. आता शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला. इतका काळ सिंहगडाचा कारभार शंकराजी नारायण सचिव पाहात होते. मात्र शाहू महाराजांची सूटका झाल्यावर ते शाहू महाराजांच्या पक्षात सामील झाले. 1750 पर्यंत हा किल्ला सचिवांच्या वंशजांकडेच राहिला.
 
1749 साली शाहू महाराजांच्या निधनानंतर रामराजे साताऱ्याचा कारभार चालवू लागले. रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आल्यावर ताराराणी यांनी रामराजाला 1750 साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कैदेत टाकलं आणि कारभार हाती घेतला. पण पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला.
 
याच काळात ताराराणी यांनी सिंहगडही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तो पेशव्यांनी हाणून पाडला. 1750 पासून सिंहगड पेशव्यांच्या ताब्यात गेला.
 
सिंहगड इंग्रजांकडे
पेशव्यांच्या ताब्यात सुमारे 68 वर्षं राहिल्यावर 1818 साली इंग्रजांचा पुण्यावर अंंमल सुरू झाल्यावर सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. 1818 साली इंग्रजांनी सिंहगड लुटला, भरपूर दारुगोळाही ताब्यात घेतला.
 
सिंहगडावरती लोकमान्य टिळकांनी उन्हाळ्यात राहाण्यासाठी एक बंगली बांधली. त्यांचे मित्र दाजीसाहेब खरेही तेथे राहायला येत तसेच हरी नारायण आपटेही तेथे राहाण्यास येत असत. त्यांनी लिहिलेली गड आला पण सिंह गेला ही कादंबरी याच बंगलीत लिहिलेली आहे. लोकमान्यांनी आर्क्टिक होम इन वेदाज हा ग्रंथ याच जागी बसून लिहिला होता.
 
1910 साली लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची याच गडावर भेट झाली. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही या किल्ल्याला भेट दिली.
 
गडावर कायकाय आहे?
सिंहगडावर दरवाजे आणि टाके, तटबंदीबरोबर कोंढाणेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर आहे. राजाराम महाराजांची समाझी, तान्हाजी मालुसरे आणि उदयभानू राठोड यांची समाधी आहे. तसेच लोकमान्य टिळकांची बंगलीही येथे आहे.
 
मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार गडावर, ‘बालेकिल्ला व त्याची सदर, राजमंदिर, थोरली व धाकटी सदर, त्यापुढील बंगला, राजवाडा, जवाहीरखान्यासह सरकारवाडा, अंमलदाराचा वाडा, पुणे वाडा, इस्तादकोठी, भातखळ्याची कोठी, दोन अंबरखाने, दारुखाना, कल्याण दरवाजा, यशवंत, झुंझार, आले व खांदकडा असे चार भक्कम बुरुज, चौक्या, अमृतेश्वर भैरव, कोंढाणेश्वर, गणपती, नरसिंह इ. मंदिरे, राजाराम व तानाजी यांच्या समाध्या, उदयभानचे थडगे, शृंगारचौकी इ. अनेक वास्तू होत्या.
 
त्यांपैकी बऱ्याच 1771 मध्ये दारुखान्यावर वीज पडल्याने स्फोट होऊन जमीनदोस्त झाल्या. काहींची दुरुस्ती झाली आणि काही नवीन बांधण्यात आल्या. त्यांत लो. टिळकांचा बंगला आहे.
 
आज यांतील थोड्या वास्तू सुस्थितीत अवशिष्ट आहेत. त्यांपैकी छ. राजारामांची समाधी, तानाजीची समाधी, जवाहीरखाना, दारुखाना, राजवाड्याचे अवशेष आणि कोंढाणेश्वर व अमृतेश्वर भैरव ही दोन मंदिरे इ. प्रेक्षणीय आहेत. दरवर्षी फाल्गुन वद्य नवमीला (मार्च-एप्रिल) राजारामांच्या समाधीचा उत्सव असतो, तर तानाजीच्या समाधीचा उत्सव प्रतिवर्षी माघ वद्य नवमीला भरतो.’
 
संदर्भः या लेखासाठी मराठी विश्वकोश, सिंहगड किल्ल्याचा इतिहास- डॉ. लहू कचरू गायकवाड, शिवकालीन महाराष्ट्र- अ. रा. कुलकर्णी, मोंगल दरबारची बातमीपत्रे- खंड-2- सेतुमाधवराव पगडी या पुस्तकांची मदत घेतलेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chandrayaan: पंतप्रधान मोदींनी चांद्रयान मोहिमेच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली, भावुक झाले पंत प्रधान, केल्या 3 घोषणा