Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातला चांदणी चौक येथील पूल पाडण्यासाठी अशी आहे तयारी

dhule
, शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (21:38 IST)
पुण्यातला चांदणी चौक येथील पूल पाडण्यासाठी  प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. १ हजार ३५० डिटोनेटरच्या सहाय्याने नियंत्रित स्फोटाद्वारे रात्री एक ते दोन या वेळेत पूल पाडला जाणार आहे. तसेच पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी एनएचएआयतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत.
 
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन  पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीबाबत माहिती घेतली. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, संबंधित यंत्रणेचे अधिकारी आदी उपस्थित होते
 
पुल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले आहे. ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात येणार आहे. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत. रविवारी (२ ऑक्टोबर रोजी) पहाटे  सर्व तयारी वेळेवर झाल्यास पहाटे १ ते २ च्या दरम्यान पूल पाडण्यात येईल.
 
पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून २०० मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.
 
सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त् करण्यात आले आहेत. नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये आणि पोलीसांनी दिलेल्या वाहतूक विषयक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.

Edited - Ratandeep Ranshoor 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर कोरियाने पुन्हा केली क्षेपणास्त्र चाचणी