Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुवर्ण’वीर नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार : संभाजीराजे

सुवर्ण’वीर नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार : संभाजीराजे
, मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (08:26 IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा संघटना आणि खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समन्वयक उपस्थित राहिले. त्यावेळी संभाजीराजे यांनी नांदेडधील मूक मोर्चाची घोषणा केली. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता खेळाडू नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार असल्याची घोषणाही संभाजीराजे यांनी यावेळी केलीय.
 
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरज चोप्राच्या खेळीकडे संपूर्ण भारताच्या नजरा लागल्या होत्या. त्याचवेळी नीरजनं स्वत:सह १३० कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. या स्वप्नपूर्तीनंतर आता नीरज चोप्राचा त्याच्या घरी जाऊन सत्कार करणार आहोत, अशी माहिती संभाजीराजे यांनी केलीय. इतकंच नाही तर नीरजला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण देणार आहोत. महाराष्ट्रात त्यांचा सत्कार केला जाईल, असंही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.
 
संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा सुरु करण्याचा इशारा दिलाय. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये पुढचं मूक आंदोलन होणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय. इतकंच नाही तर आपण मराठा आरक्षणाची ही लढाई संयमानं लढत आहोत. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाही,असंही संभाजीराजे यांनी म्हटलंय.
 
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही सामंज्यस्याची असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय. तसंच मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलंय. वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आजच्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. आपल्याला असंच एकजुटीनं लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे, असं आवाहनही संभाजीराजे यांनी केलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरफोडी करुन गावाकडं थाटला संसार, 7 वर्षांनी पोलिसांनी आवळल्या मुसक्या