पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (रविवारी) पुणे मेट्रोचं उद्धाटन होणार आहे. त्यादृष्टीने शहरात तयारीही सुरू आहे. या कार्यक्रमावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे मेट्रोचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना त्याचे उद्घाटन होत आहे. उद्या जर काही संकट निर्माण झाले तर त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल, असे पवारांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे.
पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान उद्या पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. मोदी महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. जेथून मेट्रो धावणार आहे तेथून मी प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोचे काम झालेले नाही हे माझ्या लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही. पण उद्या जर काही संकट निर्माण झाले तर त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आज नदी सुधार प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. पण मोदींचा सुधारणा करण्याऐवजी सुविधांवर भर आहे. नदी सुधारण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. नदीवर अनेक धरणं आहेत. त्यामुळं कधी ढगफुटी झाली तर या मोठय़ा संकटाची झळ आजूबाजूच्या गावातील लोकांना बसणार आहे.