सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकाने गुरुवारी (दि.१३) दोन लष्करी अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना कॅट्सच्या आवारातून अटक केली होती. संशयित मेजर हिमांशु मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले अशी या संशयितांची नावे आहेत. हे दोघेही संशयित मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये (एम.ई.एस) नोकरीला होते. त्यामुळे कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कुलचा या अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसल्याची माहिती पुणे येथील संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली.
एका ठेकेदाराकडून बिलाच्या रकमेपोटी संशयित मिश्रा याने तक्रारदार ठेकेदाराकडून ५३ हजार ता वाडिले याने ६३ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. या दोघांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ एम.ई.एसच्या इमारतीजवळ ताब्यात घेतले. कॅट्सच्या आवारातच ही इमारत आहे. दरम्यान, सीबीआयकडून कारवाईबाबतची माहिती देण्यात आली होती. दोघा संशयितांना सापळा कारवाई करणाऱ्या पथकाने शुक्रवारी (दि.१४) न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, या दोघांना मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले आहे.
Edited By - Ratandeep Ranshoor