करोना महामारीमध्ये कधीकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला. कारण, जवळपास आठ महिन्यानंतर बुधवारी पुणे शहरात करोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नाही. शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
“पुण्यात एकही करोनाबाधित मृत्युची नोंद नाही !, पुणे मनपा हद्दीत करोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. तर महापालिका हद्दीत एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.” असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रविवारी मुंबईत देखील करोना महामारीनंतर पहिल्यांदाच दिवसभरात एकाही करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला नव्हता. निश्चितच ही बाब दिलासादायक आहे. कारण, करोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबई, पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये दररोज मोठ्याप्रमाणावर करोनाबाधित रूग्ण आढळण्याबरोबरच, रूग्णांच्या मृत्युंची देखील नोंद होत होती.