पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जवळ किणी टोल नाकाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला मोटारीची धडक बसल्यानंतर अपघातग्रस्त मोटारीला मागून एका ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात बंगळुरू येथील तिघांचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली आहे.
याबाबत वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.निलेश कुमार सी (वय ४२), संजना माहेश्वरी (वय २७) जिथ्या त्रिलेश (वय ११, रा. सर्व मीनाक्षीनगर बेंगलोर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात अरींनी एन. (वय ४१, रा. बेंगलोर) या जखमी झाल्या आहेत.
अपघातात निलेश कुमार सी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या महिंद्रा मोटारीतून बंगळुरूकडे निघाल्या होत्या. रात्री सव्वा बारा वाजता ते किणी टोल नाक्यापासून पुढे आले. तेथून काही अंतरावर एक कंटेनर उभा होता. त्याच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर, बॅरॅकेटेड किंवा टेललाईट याची व्यवस्था केलेली नव्हती. राष्ट्रीय महामार्गावरील वारणा नदीवरील पुलाच्या उतारावर वळणावर हा कंटेनर उभा केला होता. मोटार चालकास रात्री तो नीट दिसला नाही. मोटार कंटेनरला पाठीमागून धडकून अपघात झाला. तर मोटारीस मागून आलेल्या ट्रक चालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगाने वाहन चालवून जोरात धडक दिली.