पुणे महापालिकेकडून जास्त पाणी वापर होत असून, पाणी वापरावर मर्यादा असे पत्र पाटबंधारे खात्याने महापालिकेला पाठविल्यानंतर आता पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. महिन्यातून दोन दिवस पाणी पुरवठा पूर्ण बंद केल्यास वर्षभरात किमान सव्वा टीएमसी पाण्याची बचत होऊ शकते, त्यामुळे याबाबत पाणी पुरवठा विभागाने आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासला धरण प्रकल्पातील चारीही धरणे व भामा आसखेड धरणात पुरेसा पाणी जमा झाले आहे. मात्र, कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
शहराला पाणी पुरवठ्यासाठी ११.५० टीएमसीचा करार झालेला असूनही सध्या १८ टीएमसी पेक्षा जास्त पाणी वापर सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडत आहे. आगामी काळात शेतीसाठी रबी व उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्यास महापालिका जबाबदार असेल असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठवले होते. पाणी वापर कमी करण्यासाठी महिन्यातून दोन दिवस पाणी बंद ठेवावे. ही पाणी कपात केल्याने वर्षभरात किमान १.२५ टीएमसी पाण्याचा वापर कमी होऊ शकेल असा प्रस्तावात नमूद केले आहे.