पुण्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या चर्चा आहे. महायुती समन्वय समितीने घटक पक्षांतील कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेऊन देखील माजी नगरसेवकांना भाजपमध्ये घ्यायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठकीत घेणार आहे.
आज मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर आहे. ते आज महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. सूत्रांनुसार, या बैठकीत शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोंबत अजित पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावर चर्चा होणार आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या39 नगरसेवकांपैकी जवळपास 34 जण अजित पवार गटासोबत आहेत, त्यातील 21 नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी कोणता अंतिम संदेश देणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.