जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) देण्यात आली आहे.
दिनांक 16 नोव्हेंबर 2021 पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विविध जिल्हयातून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती करणेबाबत बार्टीकडे विनंती केलेली होती. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु असून त्याकरिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने, अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दिनांक 17 ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. तसेच अशा सूचना सर्व जातपडताळणी समित्यांनाही बार्टीमार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत