Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्र

रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्र
राज्यातील पुणे-नाशिक व नांदेड-बिदर या दोन नव्या रेल्वे मार्गांना मंजूरी मिळाली असून राज्यात नऊ रेल्वे गाड्या नव्याने धावणार आहेत. तर अमरावती-मुंबई, पुणे-पटना या गाड्या आता दैनंदिन धावतील. केंद्राचा रेल्वे अर्थसंकल्प शुक्रवारी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी संसदेत सादर केला. नव्या गाड्यांसह चार गाडयांचा विस्तार व राज्यातून धावणार्‍या काही गाडयांच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामधील अनेक उपक्रमांची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे.

पुणे-नाशिक व नांदेड-बिदर या नव्या मार्गांना मंजूरी मिळावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्र्यांना सविस्तर पत्र लिहिले होते. या मार्गांना मंजूरी मिळाल्याने पुण-मुंबई-नाशिक या औद्योगिक त्रिकोणाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. नव्याने सुरु झालेल्या नऊ गाडयांमध्ये विशाखापट्टण-सिकंदराबाद-मुंबई, श्रीगंगानगर-दिल्ली-नांदेड, पुणे-दौंड-सोलापूर, मुंबई-कारावार, मुंबई-वाराणसी, मुंबई-जोधपूर-बिकानेर, गोरखपूर-मुंबई, वेरावळ-मुंबई, मुंबई-जोधपूर या गाडयांचा समावेश आहे. तसेच राज्यातून धावणार्‍या हैद्राबाद-उस्मानाबाद या गाडीचा विस्तार पुणे, मुंबई-जयपूर गाडीचा दिल्ली, नागपूर-गया दीक्षाभूमी एक्सप्रेस कोल्हापूर तर मुंबई कानपूर उद्योगनगरी एक्सप्रेसचा विस्तार प्रतापगडपर्यंत वाढविण्यात आला आहे.

देशात विनाथांब्याच्या बारा नव्या रेल्वेगाडा सुरु करण्यात आल्या असून मुंबई-हावडा, मुंबई-अहमदाबाद, पुणे-दिल्ली या तीन गाडा राज्याच्या वाट्याला आल्या आहेत. युवा वर्गासाठी मुंबई-दिल्ली ही पहिली युवा रेल्वेगाडी मुंबईतून सुटणार असून तिचे भाडे केवळ २९९ रुपये इतके राहणार आहे. मुंबई-दिल्ली माल वाहतूकीचा स्वतंत्र कॉरिडॉर प्राधान्याने विकसित केल्या जात असतानाच या मार्गाशेजारी औद्योगिक पट्टाही विकसित करण्यावर रेल्वे खाते गांभीर्याने विचार करीत आहे.

देशातील ५० रेल्वे स्थानके सार्वजनिक व खासगी सहभागातून आंतरराष्ट्रीय दर्जाची केली जाणार असून त्यात राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरचा समावेश आहे. तसेच ३७५ स्थानके आदर्श स्थानके म्हणून विकसित केली जाणार असून त्यात अंधेरी, बांद्रा, बेलापूर, भांडूप, भाईंदर, बोरिवली, चर्नीरोड, चेंबूर, चर्चगेट, करीरोड, दादर, डहाणूरोड, डॉकयार्डरोड, डोंबिवली, घाटकोपर, गोरेगाव, कर्जत, कसारा, खोपोली, किंग्जसर्कल, कुर्ला, मालाड, मरीनलाईन, माटुंगा, मिरारोड, मुलूंड, मुंबई सेंट्रल (लोकल), नाहूर, नायगाव, पनवेल, सानपाडा, सांताक्रुझ, सफाळे, टिळकनगर, उल्हासनगर, वाणगाव, वाशी, विरार, लातूर, परळी वैजनाथ, सांगली, शिवाजीनगर (पुणे) या ४३ स्थानकांचा समावेश आहे.

देशातील ५० रेल्वे स्थानके बहुउद्देशीय रेल्वे स्थानके म्हणून विकसित केली जाणार असून या स्थानकांवर मॉल्स, हॉटेल्स, पार्किंग आदींची अत्याधुनिक व्यवस्था राहणार आहे. त्यात नाशिक, नांदेड, शिर्डी, मनमाड या स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालय देशात रेल्वे कर्मचार्‍यांसाठी १९ वैद्यकीय महाविद्यालये उघडणार असून त्यातील एक नागपुरात उघडले जाणार आहे. शिवाय देशातील सात पैकी एक नर्सिंग महाविद्यालय कल्याण (मुंबई) येथे उभे राहणार आहे. याशिवाय रेल्वे रुंदीकरणाच्या चालू प्रकल्पामध्ये लातूर-मिरज मार्गावरील पंढरपूर-मिरज रेल्वेमार्ग यावर्षी पूर्ण केला जाईल, तर नागभिड ते नागपूर या रेल्वेमार्गाचे रुंदीकरण करण्यात येईल, असे अर्थसंकल्पात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi