राज ठाकरेंचा भलेही एकही खासदार निवडून गेला नसेल पण त्यांनी मांडलेला मुद्दा मात्र दिल्लीश्वरांच्या कानात चांगलाच झणझणला. रेल्वे भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याच्या मुद्यावर त्यांनी छेडलेल्या आंदोलनाचा 'योग्य' तो परिणाम झाला असून रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वेच्या भरती धोरणाची आणि रेल्वे भरती बोर्डाच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन आज दिले.
रेल्वे भरती बोर्डाच्या कारभाराबाबत अनेकांकडून तक्रारी आल्याचे सांगून, यासंदर्भात लवकरच चौकशी करण्यात येईल, असे त्या बजेट मांडताना म्हणाल्या. महाराष्ट्रात होणार्या रेल्वे भरतीत परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करून गेल्या वर्षी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बिहार व युपीहून आलेल्या विद्यार्थ्यांना झोडपून काढले होते. त्या त्या राज्यांच्या रेल्वे भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी मनसे, शिवसेना या पक्षांची मागणी आहे. ममतांनी अखेर या मागणीचा विचार केल्याचे यातून दिसून आले.