Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय?, नाना पटोलेंचा सवाल

nana patole
, बुधवार, 8 जून 2022 (07:44 IST)
अपक्ष आमदार नाराज असणं योग्यच आहे. आपल्या मतदारसंघातील कामाबाबत जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय?, असा सवाल करत नाना पटोले यांनी आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाची अंमलबाजवणी करण्याची आठवण करून देऊ, असे सांगितले आहे. बैठकीपूर्वी त्यांनी हे विधान केलं आहे.
 
येत्या १० जून रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. यावेळी बैठकीसाठी अपक्षांसह सर्व आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन केले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते एच.के.पाटील ( H K Patil) हे संबोधित करणार आहेत. दरम्यान, या बैठकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हे महत्त्वाचं विधान केलं आहे.
 
आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय?
जे अपक्ष आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर केली जाणार आहे. मतदान ही एक संधी असते. या निमित्ताने आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता येतात. या आमदारांनी जनतेच्या हितासाठी काही गोष्टी मांडल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यामध्ये आमदारांचे काय चुकले, असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अल कायदाची भारतात आत्मघातकी हल्ल्याची धमकी; दिल्ली, मुंबईसह हे शहर टार्गेटवर