Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग

रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग
* घराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वांत आधी जात असेल तर तो तिचा भाऊ! 

* शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणार्‍या लहान भावाचा कोमल हात तिला संरक्षण देतो. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा रण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो.

* लहान भावाच्या झालेल्या चुका स्वत:वर ओढवून घेणारी ताई आई-बाबाकडून मिळणारा 'प्रसाद' वाचविते. तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो.

* शाळेच्या मुख्याध्यापिका पहिल्या इयत्तेत झोपलेल्या लहानग्याला घेऊन जायला सांगतात तेव्हा त्याची ताई शांत निजलेल्या आपल्या भावाला हळूवार आपल्या वर्गात घेऊन जाते आणि त्याला मांडीवर झोपवून फळ्यावरील लिहिलेले आपल्या वहीत उतरवून घेत असते.

* लहान श्रुती रडतच आपल्या मोठ्या भावाच्या वर्गात गेली व तिला चिडवणार्‍या तिच्या वर्गातील मुलांची नावे सांगायला लागली. तिचे डोळे पुसत मधल्या सुटीत त्यांना चांगला मार देऊ सांगताच छोट्या ताईचे रडणे एकदम बंद झाले व ती पुन्हा हसत खेळत आपल्या वर्गात जाऊन बसली. तिच्या मते मोठ्या भावाने दिलेले आश्वासन म्हणजे काम फत्ते असंच ती समजते.

* शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या खिदळण्यात केव्हा मोठी होते कळतच नाही. मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा 'बॉडीगार्ड'च बनूनच जातो. तिच्या आवडीनिवडींची काळजी घेतो तर तिला संकटामधून आधार देतो.

* ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो. ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते. सरबराईत गुंतलेले हात घेऊन तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो.

* भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो.

* आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi