चैत्र पाडव्यासून रामनवमीपर्यंतचा काळ हा रामाच्या नवरात्राचा मानला जातो त्याप्रमाणे गणपतीची गाणी, आरत्या ऐकायला यायला लागली की गणपती आगमनाचे वातावरण तयार होऊ लागते त्याचप्रमाणे रामाचे संगीत चरीत्र म्हणून ज्याचे नाव घेता येईल ते अजरामर 'गीतरामायण' हे एकमेवाद्वितीय काव्य प्रत्येकाच्या मनात वाजायला लागतं.
तुलसीदास, वाल्मिकी या सारख्या थोर व महान व्यक्तींनी लिहिलेल्या रामायणा इतके सुरस रामचरित्र आजच्या आधुनिक संतविभूतीने गीतमालेत गुंफले अन् तशाच अवीट स्वरात गायले गेले. या दोन महान विभूती म्हणजे महाकवी गदिमा अन् बाबूजी अर्थात सुधीर फडके.
गीतरामायण हे नुसते रामाचे चरित्र नाही किंवा नुसते काव्यही नाही. ते शब्दशिल्प आहे. बाबूजींचे हे शब्दशिल्प स्वरात कोरले. 'गदिमां'चे असामान्य शब्दप्रभूत्व या गीतरामायणातून दिसून येते. त्यांचे एकेक शब्द त्या गीतरामायणातील ओळी ह्या आजही एक उत्कृष्ट शब्दालंकार म्हणूनच मानल्या जातात. त्यातल्या उपमा, संस्कृतप्रचुर शब्द यामुळे मराठीचे सौंदर्य 'गीतरामायणाने' वाढवले, खुलवले असे म्हणता येईल.
रामाच्या स्वरूपाचे वर्णन करणारे लव-कुश 'ज्योतीने तेजाची आरती' किंवा रामादी भावंडांना 'चार वेदांची' उपमा असो या सारख्या कितीतरी उपमांचे सप्तरंगी महालच गदिमांनी साकारले आहेत.
लक्ष्मणाविषयी 'अनुज' या नावाचा केलेला वापर, 'आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे' या सारख्या उपमातर अंगावर रोमांच आणतात. अशा उपमा आता वाक्प्रचार बनल्या आहेत. तो त्रिखंडाचा देव विष्णू त्याचाच अवतार असणारा हा राम व धरेची मुलगी 'दुहीता' असणारी सीता यांचे झालेले मीलन म्हणजे 'मायाब्रम्ह' असे वर्णन करतात, तेव्हा या मीलनाचे भव्यत्व गदीमा किती सार्थ शब्दांत सांगतात, असे लक्षात येते.
प्रत्येक भावानुसार (शांत, रौद्र इ.) वापरात आलेले शब्दही तसेच आहेत त्राटिका वधावेळी रामाला आदेश देणारे विश्वामित्र 'सायका, कार्मुका, तप्त आरक्त लोचने' यासारख्या रुद्रा रसात न्हाऊन निघालेले दिसतात, आणि बाबूजींचे स्वरही या रौद्ररसात भिजलेले असतात. बाबूजींच्या आवाजातले हे 'सोड झणी कामुर्का.....' ऐकल्यावरच आपण वीर रसाने भारून जातो व आपले हात शिवशिवात.
कैकयीची निर्भत्सना करणारा लक्ष्मण आपली रामावरची भक्ती दाखवतो त्या गाण्यात तर शांत व रुद्र रसाचा उत्तम मिलाफ दिसतो एकीकडे रामाच्या वनवासाविषयी चिंता व पित्याचा 'विषय धुंद राजा.....' या शब्दात तो धिक्कारही करतो.
रामाच्या वनवास गमनानंतर भयाण झालेली अयोध्या, राजा जनक व अन्य नागरिकांची व्यथा ही ते अशा शब्दात मांडतात की आपसुकच डोळे झरु लागतात. 'या इथे लक्ष्मणा बांध कुटी....' ऐकताना तर त्यावेळचे दंडकवनच समोर उभे राहते या अन् अशा अनेक गाण्यात आपण गुंतुन जातो.
सतत राम-सीतेचा रक्षणार्थ सज्ज असणारा लक्ष्मण रामाच्या भल्याचा विचार करणारा 'आश्रया गुहेकडे..... ' गीतरामायणात तर पदोपदी दिसतो.हनुमानच्या वर्णनात तर 'पेटवी लंका हनुमंत.....' असा तो एकच श्री हनुमान... या सारख्या गीतातून तर स्वामीभक्त हनुमानाचेही दर्शन होते.
पूर्वी म्हणे जेंव्हा आकाशवाणीवरून गीतरामायणातील गीते दर आठवड्याला एक याप्रमाणे मालीकेच्या स्वरूपात सादर होत असे त्यावेळी लोकं आपली कामधाम बाजूला ठेवून भक्तीभावाने अगदी रेडीओला हार, फुलं घालून त्यापुढे नारळ फोडून उदबत्ती वगैरे ओवाळून (नादब्रम्हाची सगुण पुजाच बांधायचे!) मग श्रवणभक्तीसाठी बसत असत.
अनेक उपमारत्नांनी भरलेला हा गीतरामायणाच रत्नहार गदिमा व बाबूजी सारख्या रत्नपारख्यांच्या नजरेतून बनलेला असल्याने तो या पुढच्या पिढ्यान् पिढ्यांना ही आपल्या सौंदर्यानी मोहवत राहील यात शंकाच नाही.