Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामरक्षेची निर्मिती : शंकरांनी माता पार्वतीस सांगितलेली कथा

रामरक्षेची निर्मिती : शंकरांनी माता पार्वतीस सांगितलेली कथा
, सोमवार, 19 एप्रिल 2021 (21:33 IST)
रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ?
 
"तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्र विषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. 
 
ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरां कडे ते प्राप्त करण्या साठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्या मध्ये खूप वाद झाले.
 
शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वां मध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली.
 
ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडे च ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्याना साठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले.
 
त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्या नंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली. 
 
काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा 'रामरक्षेची ' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे. 
 
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः || तथा लिखितवान्प्रात: प्रबुध्हो बुधकौशिकः ||
 
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ----------शतकोटीचे बीज म्हणजे राम हि ती दोन अक्षरे.
 
‘श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?
परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे.
 
बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.
 
हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते. व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्या पासून निश्चित फायदा आहेच.
 
रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमी पर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा या प्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यम नियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्या शिवाय राहात नाही.
 
-सोशल मीडिया साभार

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रभू राम यांच्यावर लिहिलेल्या या 5 रामायणच वाचा