वाल्मिकीकृत रामायण हा भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे. या रामायणाने देश-विदेशात अनेकांना रामकथा नव्याने सांगण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच आज तीनशेहून अधिक प्रकारच्या रामकथांच्या आवृत्त्या देश-विदेशात प्रचलित आहेत. इतकेच नव्हे तर नाट्य, संगीत, शिल्प व चित्रकलेतही ही रामकथा प्रतिबिंबित झाल्याचे दिसन येते.
रामायण या शब्दाची फोड आहे रामाचे अयन. याचा शब्दशः अर्थ आहे रामाचा मार्ग किंवा 'रामाने केलेल्या प्रवासाचा मार्ग'. अयन म्हणजे मार्ग. रामाने केलेल्या दोन विजययात्रांचा संदर्भ या नावामागे आहे. रामाच्या पहिल्या यात्रेत प्रेम, आनंद, उल्हास आणि उत्साह हे रंग दिसून येतात. दुसर्या यात्रेत मात्र दुःख, क्लेश, वियोग, वेदना या भावनांचे प्रतिबिंब आढळते. जवळपास सर्वत्र रामाच्या दुसर्या विजययात्रेवरच प्रामुख्याने भर दिला जातो. एकश्लोकी रामायणातही रामाच्या वनात जाण्यापासून ते रावणवधापर्यंतचाच प्रवास दिसतो.
अदौ राम तपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनम्।
वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणम्।
वालि निग्रहणं समुद्र तरणं लंका पुरी दास्हम्।
पाश्चाद् रावण कुंभकर्ण हननं तद्धि रामायणम्।
ही दुसरी रामकथा म्हणजे रामाच्या सीता शोधाची कथा आहे. पण त्याचा नीट अभ्यास केला तर ही कथा त्यावेळचा भूगोलही सांगते असे दिसते. भारत आणि परदेश यांचे स्थान निश्चित करताना अनेक भौगोलिक संदर्भ यातून मिळतात. वाल्मिकी रामायणाच्या किष्किंधा कांडातील चाळीस ते त्रेचाळीस अध्यायात याचे विस्तृत वर्णन आहे. त्याला 'दिगवर्णन' अर्थात दिशांचे वर्णन म्हटले आहे. वानर राजा वालीने आपले दूत विविध दिशांना पाठवले होते. त्याच्या या वर्णनावरून त्यावेळचा आशिया खंड कसा होतो हे कळते. पुढे सुग्रीव राजा झाल्यानंतर त्यानेही सीतेला शोधण्यासाठी विविध दिशांना दूत पाठवले होते. त्यात यवद्वीप (जावा) आणि सुवर्ण द्वीप (सुमात्रा) येथेही पाठवले होते. यात शिशिर नावाच्या एका पर्वताचे वर्णन आहे. या पर्वताचे शिखर स्वर्गाला टेकले होते आणि त्यावर देवदेवता वास करतात असे म्हटले होते.
यनिवन्तों यव द्वीपं सप्तराज्योपशोभितम्।
सुवर्ण रुप्यक द्वीपं सुवर्णाकर मंडितम्।
जवद्वीप अतिक्रम्य शिशिरो नाम पर्वत:।
दिवं स्पृशति श्रृंगं देवदानव सेवित:।१
दक्षिण आशियाच्या इतिहासाचा भारतीय इतिहासातील उल्लेख हा अशा प्रकारे रामायणकाळापासून मिळतो. इंडोनेशियाच्या बोर्निया बेटावर तिसर्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच भारतीय संस्कृतीचे अवेशष मिळतात. याच बेटावर मूलवर्माचा एक संस्कृत शिलालेखही पहायला मिळतो. त्यावर खालील श्लोक लिहिला आहे.
श्रीमत: श्री नरेन्द्रस्य कुंडगस्य महात्मन:।
पुत्रोश्ववर्मा विख्यात: वंशकर्ता यथांशुमान्।।
तस्य पुत्रा महात्मान: तपोबलदमान्वित:।
तेषांत्रयानाम्प्रवर: तपोबलदमान्वित:।।
श्री मूलवम्र्मा राजन्द्रोयष्ट्वा वहुसुवर्णकम्।
तस्य यज्ञस्य यूपोयं द्विजेन्द्रस्सम्प्रकल्पित:।।२
या श्लोकात मूल वर्माचे वडिल अश्ववर्मा व त्याचे आजोबा कुंडग यांचा उल्लेख आहे. या सगळ्याचा मतितार्थ हा आहे, की त्यावेळी भारतीय लोक तिथे पोहोचले होते.
जावा बेट व त्या परिसराच्या वर्णनानंतर शोणनद उर्फ काळ्या मेघांसारखा दिसणार्या समुद्राचा उल्लेख आहे. या समुद्रात सतत गर्जत असतो. याच समुद्राच्या तटावर गरूडाची निवासभूमी शल्मलीक बेट आहे. तेथे मानदेह नावाचा राक्षस रहातो. सुरा समुद्रावरील दगडी शिखरांवर तो लटकलेला असतो. याच समुद्राच्या पुढे घृत व दधि या नावाचे समुद्र आहेत. पुढे श्वेत आभा असलेल्या क्षीर समुद्राचे दर्शन होते. या समुद्राच्या मध्ये ऋषभ नावाचा पांढरा पर्वत आहे. त्यावर सुदर्शन नावाचे सरोवर आहे. क्षीर समुद्रानंतर ज्याचे पाणी पिण्यायोग्य आहे, असा एक समुद्र आहे. त्याच्या मध्ये मोठा असा घोडा आहे. त्याच्या तोंडून आग निघत असते.
या वर्णनाचा संबंध महाभारताशी आहे. भृगुवंशी और्व ऋषींच्या रागातून ज्वाळा निघाल्या. या ज्वाळा त्यांनी समुद्रात टाकल्या. या ज्वाळा जेथे विसर्जित केल्या गेल्या तेथे घोड्याचे मुख (वडवामुख) तयार झाले. त्यातून ज्वाळा निघू लागल्या. त्यालाच वडवानल म्हणतात. प्रशांत महासागराच्या याच भागात एखाद्या ज्वालामुखीचा संदर्भ यातून दिला गेला असावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मलस्कार ते फिलिपाईन्स या दरम्यान हा ज्वालामुखी असावा. कारण या मार्गात अनेक ज्वालामुखी आहेत. दधि, धृत, सुरा, पांढर्या आभेचा क्षीर सागर हे सगळे पाण्याच्या रंगांनुसार पाडलेले समुद्रांचे प्रकार असावेत.
वडवामुखापासून तेरा योजने दूर उत्तर दिशेला जातरूप नावाचा सोन्याचा पर्वत आहे. तेथे पृथ्वीला धारण करणारा शेष नाग बसलेला असतो. त्या पर्वतावर ताडाचे चिन्ह असेलला सुवर्ण ध्वज फडकत असतो. हा ध्वजच पूर्व दिशेची सीमा आहे. त्यानंतर सुवर्णमय उदय पर्वत आहे. त्याच्या शिखराला सौमनस असे म्हणतात. सूर्य उत्तरेकडून फिरून जम्बू बेटाला प्रदक्षिणा घालून सौमनसावर स्थिर होतो, त्यावेळी त्याचा सुवर्णरंग दिसून येतो. या पर्वतापलीकडे अज्ञात प्रदेश आहे, असे रामायणात म्हटले आहे.
यातल्या जातरूपचा अर्थ सोने असा होते. याचा अर्थ रामायणकारांना प्रशांत महासागाराच्या पलीकडे असलेल्या दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको या देशाचा उल्लेख करायचा असू शकतो. मेक्सिकोमध्ये अनेक सोन्याच्या खाणी होत्या नि आहेत. मक्षिका या शब्दाचा एक अर्थ सोने असाही आहे. त्यामुळे मेक्सिको हा शब्द मक्षिकेपासून विकसित झालेला असू शकतो. सोन्याच्या खाणींचा देश मेक्सिको असे त्याचे नाव पडले असावे. तेथेही आशियाई संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
विष्णू पुराण आणि रघुवंशात बालखिल्य ऋषींचा उल्लेख आहे. त्यात त्यांची संख्या साठ हजार आणि आकार आंगठ्याहून लहान असल्याचे वर्णन आहे. हे सर्व सूर्याच्या रथाचे घोडे आहेत, असेही त्या म्हटले आहे. याचा अर्थ सूर्याच्या किरणांचे हे मानवीकरण असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. उदय पर्वताच्या सौमनस या सुवर्णमयी शिखरावर प्रशांत महासागरात सूर्योदयावेळी जे किरण पडत असतील त्यावेळी असेच काहीसे दृश्य दिसत असेल. म्हणूनच या किरणांना मानवी रूप दिले गेले असावे.
वाल्मिकी रामायणात पूर्वेप्रमाणेच दक्षिण, पश्चिम व उत्तर दिशेला जाणार्या दूतांचा मार्गही सविस्तर वर्णन केला आहे. उत्तरेला ध्रुव प्रदेश, दक्षिणेला लंका आणि त्या भागातील परिसर. पश्चिमेला अटलांटिक समुद्र याचेही वर्णन यात आहे
बैखानस सरोवराच्या पुढे सूर्य व चंद्र दिसत नाहीत. नक्षत्र आणि ग्रहही दिसत नाहीत. त्या पलीकडे शैलोदा नामक नदी आहे. पुढे सिद्ध पुरूष रहातात असा प्रदेश आहे. मग त्यानंतर समुद्र आहे. तिथे सोमगिरी नावाचे सुवर्णपयी शिखर आहे. हे वर्णन उत्तर ध्रुवीय प्रदेशाचे असावे असे अभ्यासकांचे मत आहे. सहा महिने सूर्य या काळात दिसतो.
राम कथेतील हे विदेशी संदर्भ पाहिल्यानंतर ती किती ग्लोबल आहे याचा पत्ता लागतो. शिवाय रामकथा जेथे गेली तिथल्या जनजीवनावरही तिने प्रभाव टाकला आहे, हे लक्षात येते. म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, तिबेट,, चीन, जपान, मंगोलिया, तुर्कस्तान, श्रीलंका व नेपाळ या देशातही रामकथा विविध माध्मातून व्यक्त केली जाते. नृत्य, नाटक, साहित्य आणि शिल्प व चित्रकलेतून ती दिसते. शिवाय अनेक शिलालेखातूनही ही कथा सांगितली गेली आहे.