Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहम्मद पैगंबर

मोहम्मद पैगंबर
मोहम्मद पैगंबर (९ ‍रबीउल अव्वल हिजरी पुर्व ५३ - १२ रबीउल अव्वल हिजरी ११) हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादि नावांनीही संबोधित केले जाते. जगातील एका महत्त्वपुर्ण धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्वाचे स्थान आहे.

प्रारंभिक जीवन
मोहम्मद यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात ९ रबीउल अव्वल, हिजरी पुर्व ५३ तदनुसार एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला. त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे काका अबू तालिब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने मोहम्मद यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सिरीया व येमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. वयाच्या २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४० वर्ष इतके होते.

कुराणाचे अवतरण
'हिरा' ही गुहा जिथे मोहम्मदांना जिब्राईल या देवदुताने प्रथम संदेश दिला.
मोहम्मद यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जावून दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील [४] एका दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदुताने त्यांना अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- "वाच". मोहम्मदांनी देवदुताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदुताने दुस-यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिस-यांदा देवदूत म्हणाला:

वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.

ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरीत झालेल्या ओळी मानल्या जातात. मोहम्मदंना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. काही पाश्चात्य इतिहासकारांच्या मते मोहम्मदांना अपस्माराचा आजार होता व त्या झटक्यांमध्ये त्यांना ईश्वरी संदेश प्राप्त होत असे.

मोहम्मदांनी इस्मालचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्विकारला. मोहम्मद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकुण ४० व्यक्तींनी इस्लामचा स्विकार केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi