अचानक नोकरी जाणे हे एखाद्या दुस्वप्नासारखे असते. अचानक सगळे थांबल्यासारखे वाटते आणि भवितव्याची चिंता मन पोखरू लागते. सगळे काही अनिश्चित बनते. अशा वेळी आशेचा किरण शोधणे हे अतिशय धैर्याचे आणि संयमाचे काम आहे. पण हाच आशेचा किरण आपल्याला पुढे नेऊ शकतो. भविष्यकालीन अनिश्चितता संपवू शकतो. म्हणून तो किरण आपल्या मनातूनच काढून पृष्ठभागावर आणला पाहिजे.
विमनस्क होऊ नका.
नोकरी गेल्यानंतरही सैरभैर होऊ नका. शांत व्हा. स्थिरचित्त व्हा. विमनस्क होऊ नका. विचारशक्ती सुरू रहाणे या काळात अत्यंत गरजेचे आहे. आशावाद हाच तुम्हाला या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या आशावादी दृष्टिकोनातून लोकांमध्ये मिसळा. त्यामुळेच तुम्हाला दुसरी नोकरी वा रोजगाराचे दुसरे साधन मिळू शकतो. शिवाय हा दृष्टिकोन इतरांवर प्रभाव पाडून तुमच्याविषयी सकारात्मक मन बनविण्यासाठी प्रेरणादायक ठरू शकतो. नोकरी गेल्यानंतरही मिळणार्या 'पॅकेज'कडे नीट लक्ष द्या. त्यानंतरच्या शक्यता आजमावा. भावी करीयरसाठी काय करता येईल याचा नीट विचार करा. कंपनीकडून काही प्रशिक्षण मिळते आहे का ते बघा. कदाचित या प्रशिक्षणातून तुम्हाला पुढचा रोजगाराचा मार्ग सापडू शकतो.
संधीचा फायदा घ्या.
हा काळ म्हणजे संधी समजा. करीयरचा पर्याय स्वीकारताना कदाचित तुमची भरभराटच होईल. एरवी नोकरीत असताना तुम्ही कधी याचा विचारच केला नसता, ती संधी आता तुम्ही साधू शकता. एक लक्षात ठेवा जीवन हे विविध पर्यायांनी भरलेले असते. हे नाही तर ते आयुष्यात असतेच. त्यामुळे ही नाही तर दुसरी नोकरी तुम्ही पकडू शकता. संधींचा शोध घेण्यासाठी एखाद्या व्यावसायिक सल्लागाराची मदत घेतली तरी चालेल.
तब्बेतीला जपा.
या काळात तब्बेतीकडे लक्ष द्या. त्यासाठी दिनचर्या व्यवस्थित राहू द्या. तणावमुक्त रहा. खर्चात कपात करावीच लागेल. पण आरोग्य खर्च हा यात सगळ्यात शेवटी यायला हवा. तुमची तब्बेतच चांगली राहिली की आपोआपच त्यावरचा खर्चही कमी येईल. आपल्या जवळच्या लोकांकडून मदत घ्या. अभिमान, गर्व वगैरे जरा बाजूला ठेवा. तुमच्या चांगल्या संपर्कामुळेच तुम्हाला कदाचित भवितव्य घडवता येऊ शकेल.
सकारात्मक विचार करा.
सकारात्मक विचारांमुळे सकारात्मक उर्जा उत्पन्न होते. ती नकारात्मकतेला दूर ठेवते. नकारात्मक विचार येणार नाहीत, असे नाही. पण त्यांचा विचार करू नका. म्हणूनच चांगल्या लोकांना ऐका. त्यांच्या सानिध्ध्यात रहा. त्यामुळे चांगले विचार तुमच्याही मनात येतील. त्यांच्याकडून कदाचित तुम्हाला चांगला सल्ला मिळू शकेल. म्हणून मनाचा रस्ता मोकळा ठेवू द्या. बाहेरून चांगले विचार त्या रस्त्याद्वारे तुमच्या मनात येऊ शकतील. उदासीचे मळभ बाजूला करा. तर्कदृष्ट्या विचार करा. नकारात्मक मत नोंदवू नका. तसे केल्यास तुमचे विचारही तसेच होतील. म्हणून वाचनही प्रेरणादायी, सकारात्मक करा.
योग्य वेळेची वाट पहा.
तुमच्या मनात काय करायचे आहे ते नक्की करून ठेवा. त्यासाठी वाट पहा. वेळ आल्यानंतर, संधी मिळाल्यानंतर ती साधून घ्या. पण त्यासाठी वेळेची वाट पहा. त्यासाठी थोडा संयम राखा. स्वतः बनवलेल्या नियमांचे पालन करा. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी तुमच्यात काही कमी असेल तर ती दूर करा. काहीवेळा तुमच्याकडे जे जास्त असते तेही अशावेळी अडथळा ठरते. अशावेळी त्याला थोडे झाकून ठेवा.
कुटुंबाला विश्वासात घ्या.
ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कौटुंबिक बाबतीत शांतता राहू द्या. पत्नी, मुलांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगा. त्यामुळे या कसोटीच्या काळातही त्यांना आपल्यावरची जबाबदारी लक्षात येईल. घरातील ताणतणाव दूर होतील. हे बघा, घरचा पाठिंबा तुमच्या पाठिशी असेल तर अवघडातील अवघड काम तुम्ही कराल. घरची शांतता, तुमचे मनही शांत ठेवते. ही शांतताच पुढे जायला बळ देते. आता नोकरी नाही हे समजून घेऊन खर्च करा. तुमचे खरे मित्रही या काळात ओळखू येतील. पैसा नसल्यावर जे मित्र तुमच्यापासून निघून जातील, तुमच्याबरोबर रहायला टाळाटाळ करतील ते तुमचे खरे मित्र नाही हे ओळखा. सकारात्मक विचार करून खर्चावर नियंत्रण राखा.