Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिटीग्रुपचे डोळे आता सरकारी मदतीकडे

सिटीग्रुपचे डोळे आता सरकारी मदतीकडे

वार्ता

न्यूयॉर्क , शनिवार, 22 नोव्हेंबर 2008 (15:07 IST)
WDWD
शेअर्सची सातत्याने घसरगुंडी उडत असल्याने धाबे दणाणलेल्या सिटीग्रुपच्या बॅंक व्यवस्थापनाने आता सरकारशी बोलणे सुरू केले आहे. या आधी सरकारी मदत घेणार नसल्याचे बॅंकेने स्पष्ट केले होते. बॅंकेच्या अधिकार्‍यांनी फेडरल रिझर्व्ह आणि वित्त विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून या परिस्थितीतून काय मार्ग काढता येईल, याची चर्चा केली. सरकारचा पाठिंबा व वित्त विभागाकडून अर्थ सहाय्याची सिटीग्रुपला आशा आहे.

आपल्या काही शाखा इतर बॅंकांमध्ये विलीन करण्याचा निर्णय बॅंकेने अंतर्गत पातळीवर घेतला आहे. पण सरकारी मदतीशिवाय बॅंक हे करू शकेल काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सिटीग्रुपच्या प्रवक्त्या क्रिस्टिना प्रेट्रो यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.

बॅंकेच्या शेअर्समध्ये काल वीस टक्के घसरण झाली. प्रति शेअर्स किंमत ३.७७ डॉलर्सपर्यंत आली होती. आठवडाभरात बॅंकेच्या शेअर्समध्ये साठ टक्के घसरण झाली आहे. डिसेंबर ९२ नंतर ही मोठी घसरण आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे बॅंकेच्या गुतंवणूकदारांमध्ये घबराट पसरली असून या प्रकरणाचा शेवट काही तितका चांगला होणार नाही याचा अंदाज आता लोकांना आल्याचे आरबीसी कॅपिटल मार्केट्सचे बॅंकिंग विश्लेषक गेरॉर्ड काडिसी यांनी सांगितले.

दरम्यान, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित यांनी काल पत्रकार परिषद घेऊन बॅंक आपल्या व्यवसायाचे स्वरूप बदलणार नाही. तसेच स्मिथ बार्नेसह दलाली व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले. सिटीग्रुपची भांडवली स्थिती मजबूत असून कर्मचार्‍यांनी शेअर्सच्या घसरणीकडे लक्ष देऊ नये असे त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi