जागतिक मंदीचा फटक्याने शेअर बाजारात गटांगळ्या खात असलेल्या सिटी ग्रुपने आता आपले मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडीत यांचीच गच्छंती करण्याचे ठरवल्याचे कळते. मुळचे मराठी असलेले पंडित गेल्याच वर्षी बॅंकेचे सीईओ बनले होते. कठीण परिस्थितीतून बॅंकेला ते बाहेर काढतील या आशेने त्यांना या पदावर नेमण्यात आले होते.
सिटीग्रुपला वाचविण्यासाठी सध्या वेगवान हालचाली सुरू आहेत. सरकारी मदत घेणे किंवा बॅंकेचा काही व्यवसाय इतर बॅंकांना विकणे हा त्यांच्यासमोरचा पर्याय आहे. याचसंदर्भात सध्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. अनेक पर्याय विचारात घेतले जात आहेत. विक्रम पंडितांची हकालपट्टी करण्यापासून ते अगदी संपूर्ण बॅंक अथवा तिचा काही भाग विकण्यापासूचे पर्याय आजमावले जात आहेत.
बॅंकेला या कठिण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पन्नास ते शंभर अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. पण यापुढे काय कृती केली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विक्रम पंडितांचा प्रवास
श्री. पंडित जगातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या सिटी ग्रुपचे गेल्या वर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले. सोळाव्या वर्षी अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या पंडीतांनी उच्च शिक्षण घेऊन तिथेच कारकिर्दीची श्रीगणेशा केला आणि मॉर्गन स्टॅन्लेसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत अखेर सिटी ग्रुपच्या सीईओपदापर्यंतचा टप्पा गाठला. शेगावच्या गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा असणारे पंडीत आज एवढ्या मोठ्या पदावर असले तरी मनाने निखळ मराठी आहेत.