Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेस अशोक चव्हाणांच्या पाठीशी

काँग्रेस अशोक चव्हाणांच्या पाठीशी
मुंबई , गुरूवार, 18 फेब्रुवारी 2016 (11:15 IST)
राजकीय सूडबुद्धीच्या भावनेतून भाजप सरकारांनी देशभरातील काँग्रेस नेत्यांविरूद्ध सुरू केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध करताना पक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा ठराव काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मांडलेल्या याबाबतच्या ठरावाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुमोदन दिले.
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काल दुपारी प्रदेश कार्यकारिणीची बैठक टिळक भवनात झाली. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील रणनीती व कार्यक्रमावर कार्यकारिणी सदस्यांची मते जाणून घेतली. पुढील वर्षभरात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही यावेळी चर्चा झाली. फेब्रुवारी 2017 मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी अधिक उंचावण्यासाठी बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
 
वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा करताना भाजपचे केंद्र व राज्य सरकार काँग्रेस नेत्यांसोबत राजकीय सूडबुद्धीने वागत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी अशोक चव्हाणांबाबत भाजप सरकारने सुरू केलेल्या अन्याय्य व बेकायदेशीर कारवाईचा निषेध करणारा ठराव मांडला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi