Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ.कलाम यांच्या निधनामुळे वैज्ञानिक क्षेत्रातील विठ्ठल हरपला : भुजबळ

डॉ.कलाम यांच्या निधनामुळे वैज्ञानिक क्षेत्रातील विठ्ठल हरपला : भुजबळ
मुंबई , मंगळवार, 28 जुलै 2015 (12:16 IST)
भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे निधन मनाला चटका लावणारे असून, त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक क्षेत्रातील विठ्ठल हरपला अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहे.

 आपल्या शोक भावना व्यक्त करतांना छगन भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, विख्यात अणुशास्त्रज्ञ स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्राचे शिल्पकार, डीआरडीओ चे संचालक या नात्याने सर्वसामान्यांना सुपरिचित असणारे तसेच एक मनस्वी, वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी.. जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडिलधारी... ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक... आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून जाताना नोकरशाहीची कुंपणे ओलांडणारा मानवतावादी... कार्यशक्ती हा आपला गुण इतरांच्याही अंगी बाणावा यासाठी धडपडणारा हाडांचा शिक्षक अशा अनेक पैलूंनी साकारलेले बहुमुखी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द ठेवून १९६२ भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी, बंगलोरस्थित च्या कार्यक्रमात एरोडायनॅमिक्स डिझाइन, फायबर रिईन्फोर्सड प्लास्टिक या प्रकल्पात सहभागी. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही संशोधन मध्ये कार्य केले. स्वर्गवासी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार, डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

एसएलव्ही कार्यक्रमानंतर कलामांनी एकात्म क्षेपणास्त्र प्रकल्पांतर्गत १९८५ साली त्रिशुल या अग्नीबाणाची निर्मिती आणि १९८८ मध्ये रिसर्च सेंटर इमारतीची निर्मिती आणि पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. कोणत्याही परकीय मदतीशिवाय आपण आपल्या देशात इतक्या प्रगत तंत्रज्ञानाचा विकास करून ते उपयोगात आणू शकतो हे सर्वांना दाखून दिले. १९८९ साली अग्नी आणि १९९० साली आकाश व नाग या अग्नीबाणाची निर्मिती करण्यात त्यांनी केली. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले होते.

अब्दुल कलाम यांना भारत सरकारने १९८१ साली 'पद्मभुषण', १९९० साली 'पद्मविभुषण'  तर १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या निधनामुळे देश एका महान शास्त्रज्ञाला मुकला आहे. मी अब्दुल कलाम यांच्या कुटुंबियांच्या दुख:त सहभागी आहे. ईश्वर मृताच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे त्यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi