Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुचाकी चोरी रोखण्यासाठी बनवलं खास डिव्हाइस

दुचाकी चोरी रोखण्यासाठी बनवलं खास डिव्हाइस
, गुरूवार, 2 जुलै 2015 (11:38 IST)
‘गरज ही शोधाची जननी आहे.’ असं म्हणतात. मात्र असा शोध लावण्यासाठी वय किंवा शिक्षणाचा फारसा संबंध नसतो. जालन्यातील गणेश क्षीरसागर या आठवी शिकलेल्या मुलानं आपली गाडी चोरी जाऊ नये म्हणून केलेला आगळावेगळा प्रयोग हे याचंच एक उदाहरण आहे.
 
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे अंगणात लावलेली आपली दुचाकी चोरीला जाईल या धास्तीने जालन्यात राहणार्‍या गणेश क्षीरसागरने एक अनोखं डिव्हाइस बनवलं. ज्यामुळे आपली गाडी कधी चोरीला जाईल अशी चिंतासुद्धा कोणाला वाटणार नाही. गणेशने आपल्या या दुचाकीला एवढं सक्षम केलं आहे की, याला कोणी अनोळखी व्यक्तीने हात जरी लावला तरी त्याच्या मोबाइलवर लगेच कॉल येईल. ज्यामुळे आपल्या गाडीशी कोणी खटपट करतंय हे त्याला अवघ्या काही सेकंदात कळेल.
 
विशेष म्हणजे या गाडीला गणेशने अँटोमॅटिक कॉल रिसीव्ह करता यावा याची देखील व्यवस्था केली आहे. गाडीमध्ये स्पीकर बसवल्यामुळे गाडी चालवताना फोन कानाला न लावता अगदी सहज संवाद केला जाऊ शकतो. या शिवाय गाडीभोवती गणेशने आपल्या दुचाकीला एक सेन्सर बसवलं आहे. याला एक जुन्या मोबाइलची कीट जोडण्यात आली आहे. त्यामध्ये एक सिमकार्ड आणि मोबाइल बॅटरीही बसवण्यात आली. ज्यामुळे गाडीला स्पर्श होऊन ती हलली की सेन्सरद्वारे लगेच त्या कीटला सिग्नल मिळतात. ज्यामुळे अगोदरच सेट केलेल्या नंबरवर कॉल जाऊन गाडी मालक अलर्ट होतो. याशिवाय गाडीला चार स्पीकरदेखील बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्याला अवघ्या अडीच हजाराचा खर्च आला आहे. 
 
गणेशची घरची परिस्थिती तशी बेताची. लहानपणी आईचं छत्र हरवलं, वडिलांचा मोटार रिपेरिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या हाताखाली इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळण्याचा त्याला छंद लागला. दुर्दैवाने 3 वर्षापूर्वी वडिलांचेही निधन झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी गणेशने आठवीनंतरच शिक्षण सोडलं. आज तो आपल्या मोठय़ा भावाबरोबर राहून गरिबीशी दोन हात करतो आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi