मुंबई- पनवती लोकांकडून पेंग्विनबाबत टीका होत आहे, असा पलटवार करतानाच पेंग्विनपेक्षा स्वत:च्या पक्षाची काळजी करा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नाव न घेता लगावला आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानात आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एक पेंग्विन रविवारी दगावला. त्यानंतर मनसेने युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्याला उद्धव यांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.
दक्षिण कोरियाहून हे हम्बोल्ट जातीचे 8 पेंग्विन आणण्यात आले होते. ते आणले, तेव्हापासूनच मनसेसह अन्य पक्ष शिवसेनेवर टीका करत होते. एका पेंग्विनचा मृत्यू झाल्याने मनसेच्या हाती आयतेच कोलीत सापडले.