Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यावर्षीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच - तावडे

यावर्षीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच - तावडे
मुंबई , बुधवार, 25 मे 2016 (11:40 IST)
यावर्षीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2810 जागांवरील प्रवेश 5 मे, 2016 रोजी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामायीक प्रवेश परीक्षेद्वारेच (सीईटी) देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

तावडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या 2810 जागांवरील प्रवेश सीईटीद्वारे होण्याचा मार्ग मा.राष्ट्रपती यांच्या मार्फत काढण्यात येणाऱ्या अध्यादेशामुळे मोकळा झाला आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील 1720 व अभिमत विद्यापीठातील 1675 अशा एकूण 3395 जागा या नीट परीक्षेद्वारेच भरल्या जाणार आहेत. या वर्षीच्या राज्य शासनाच्या जागा सीईटी परीक्षेद्वारे भरल्या जाणार असल्याने याचा फायदा ग्रामीण भागातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना होणार असून या विदयार्थ्यांना सुध्दा वैदयकीय प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शासनाच्या जागा या राज्य सीईटी मार्फत भरल्या जातील असे जे विधान केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी केले आहे. त्याबद्दल स्पष्ट करताना श्री. तावडे यांनी सांगितले की हा विषय महाराष्ट्रासाठी लागू होत नाही. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा या राज्य सरकारमार्फत भरल्या जात नाहीत. या जागांवर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे या महाविद्यालयातील जागा एमएच-सीईटी प्रवेश परिक्षेमार्फत भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कर्नाटकमध्ये खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील 40 टक्के जागा या सरकार मार्फत भरल्या जातात.

आंध्रप्रदेशमध्ये 50 टक्के जागा या शासनाच्या ताब्यात असतात. त्यामुळे हा विषय त्यांच्याकरीता लागू आहे. महाराष्ट्रामध्ये खाजगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयातील जागा या नीटच्या माध्यमातूनच भरल्या जाणार आहेत असेही, तावडे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात अतिवृष्टीची शक्यता