Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात व्याख्यानमाला

विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात व्याख्यानमाला
WD
राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीयमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी विलासराव देशमुख सेंटरच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, कुमार केतकर, विजय कुवळेकर, अनंत दीक्षित आदी महनीय वक्ते या व्याख्यानमालेत सहभागी होणार असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतही एक परिसंवाद होणार आहे, अशी माहिती विलासराव देशमुख सेंटरचे अध्यक्ष उल्हास पवार यांनी आज दिली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते विलासराव देशमुख यांच्या निधनास १४ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी १४ ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत राज्यासमोरील विविध प्रश्नांबाबत व्याख्याने व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असेही पवार यांनी सांगितले. यावेळी विलासराव देशमुख सेंटरचे अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, पी. एन. पाटील, सुधाकर गणगणे, मुझ्झफर हुसेन आदी उपस्थित होते.

विलासराव देशमुख हे फर्डे वक्ते व हजरजबाबी नेते होते. आपल्या अमोघ वक्तृत्वाने लोकांना खिळवून ठेवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. समाजकारण व राजकारणात त्यांच्याकडून तरुणांच्या खूप अपेक्षा होत्या. पण ते अकाली काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळे त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभारण्यासाठी, त्यांनी पायाभरणी केलेली विकासकामे प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उल्हास पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, कुमार केतकर, विजय कुवळेकर, अनंत दीक्षित, राही भिडे, अतुल देऊळगावकर, शैलेश पांडे, सुरेश भटेवरा,

अभिनंदन थोरात, रामदास फुटाणे, गिरीश गांधी, अरुण खोरे, श्रद्धा बेलसरे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, धनंजय बेले, विश्वनाथ माळी, अरुण नाईक, प्रशांत जोशी, श्रीपाद अपराजीत, चेतन भाईराम, श्रीमंत माने, विजय बावीस्कर आदी वक्ते या व्याख्यानमालेत सहभागी होणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी मुंबईतही एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह वरिष्ठ मंत्री व विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी यात सहभागी होणार असल्याची माहिती सेंटरचे अध्यक्ष उल्हास पवार यांनी दिली.

सामाजिक चळवळीचे व्यासपीठ उभारणार!

स्व. विलासराव देशमुख यांना मानणारे कार्यकर्ते राज्यभरात आहेत. त्यांनी विलासरावांच्या नावाने वेगवेगळे सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नेहरू सेंटरच्या धर्तीवर एक संस्था उभी करून सामाजिक कार्यासाठी व्यासपीठ उभारण्याची संकल्पना आहे. तसेच स्व. विलासरावांच्या नावाने शिष्यवृत्तीचीही सूचना पुढे आली आहे. लवकरच याला मूर्त स्वरूप दिले जाईल, असे उल्हास पवार यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi