Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वतंत्र विदर्भाला आमचा पाठिंबा

स्वतंत्र विदर्भाला आमचा पाठिंबा

वेबदुनिया

WD
यूपीएच्या वतीने येत्या काही दिवसांत स्वतंत्र तेलगणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र तेलंगणा होत असेल तर महाराष्ट्रातील स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आमचा पाठिंबा असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया ही मागणी लावून धरणार असल्याचे आरपीआयचे अध्यक्ष माजी खा. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या

मागणीसाठी विदर्भातील प्रत्येक तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर ५ ऑगस्ट रोजी आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद येथे विभागीय कार्यकर्ता शिबिरास उपस्थित राहाण्यासाठी ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक हिंदूत्ववादी मुद्यावर लढण्याऐवजी विकासाच्या मुद्यावर लढल्या तर त्यात पक्षाला मोठे यश मिळू शकते. महाराष्ट्रात हिंदूत्ववाद चालणार नाही त्यामुळे विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढल्यास जास्त फायद्याचे राहिल, असा सल्ला देत ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या समविचारी पक्षांचा एनडीएमध्ये समावेश केला पाहिजे म्हणजे एनडीएची देशभरात ताकद वाढेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाने इतर पक्षाप्रमाणे तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथे पहिले विभागीय कार्यकर्ता शिबिर होत आहे. अशी कार्यकर्ता शिबिर विभागनिहाय घेण्यात येणार आहेत. ३ ऑगस्ट पंचगनी, ८ ऑगस्ट ठाणे किंवा वसई, ११ ऑगस्ट नागपूर, २१ ऑगस्ट अमरावती, २६ ऑगस्ट मुंबई, २८ जळगाव आणि ३० ऑगस्टला महाड येथे शिबिर होणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi