Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

“मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो..” – जितेंद्र आव्हाड; विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त

jitendra awhad
, सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (14:26 IST)
मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी “मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो”,असं ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केले असून, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
 
ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एका गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. “पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासांत २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही कलम ३५४, मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या…उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत”, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
 
असे आहे प्रकरण..
कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा – खाडी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात येताना गर्दीत आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिलादेखील होती. या महिलेने संबंधित कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या ४० वर्षीय महिलेने केला आहे.
 
महिलेने तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गु्न्हा दाखल होताच आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि आव्हाड समर्थकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर निदर्शनाला सुरुवात केली आहे. आव्हाड समर्थकांनी मुंब्रा पोलिस ठाण्याबाहेर ठाण मांडून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. तसंच पोलिस ठाण्याचे प्रवेशद्वारदेखील कार्यकर्त्यांनी बंद केले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता मांजरीला पाळण्यासाठी मांजरांची नोंदणी करावी लागणार