Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 12 March 2025
webdunia

तीन कापूस उत्पादकांना 10 लाखांचा गंडा विक्रीसाठी नेलेला कापूस चालकाने केला गायब

cotton
, गुरूवार, 18 जानेवारी 2024 (08:40 IST)
जळगाव पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील तीन शेतकऱ्यांनी चांगल्या दरासाठी गुजरातमधील जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी नेणार्या मालमोटार चालकाने बनावट क्रमांकाची पाटी लावत त्यांना सुमारे 10 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पारोळा येथील पोलीस ठाण्यात मालमोटार चालकासह वाहतूकदार व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील शेतकरी अशोक पाटील हे वास्तव्यास आहे. शेजारीच त्यांचा लहान भाऊ प्रल्हाद पाटील आणि दिनेश पाटील राहतात. अशोक पाटील यांची शेती पुनगाव शिवारात आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात कापसाला भाव कमी असल्यामुळे तिघांनी मिळून निर्णय घेत माल गुजरात राज्यातील कढी येथील बाजारपेठेत लिलावात विक्रीसाठी पाठविण्याचे ठरवले. त्यानुसार गावातील परिचयातील विजय पाटील यांच्यामार्फत जळगाव येथील हसीन रशीद खानुबेगवाला यांच्या आदर्श ट्रान्स्पोर्टशी संपर्क साधला. मालमोटारीत अशोक पाटील यांचा तीन लाख 45 हजार 600 रुपयांचा 48 क्विंटल, प्रल्हाद पाटील यांचा तीन लाख 52 हजार 800 रुपयांचा 49 क्विंटल आणि दिनेश पाटील यांचा दोन लाख 97 हजार 720 रुपयांचा 41.35 क्विंटल, असा सुमारे नऊ लाख 96 हजार 120 रुपयांचा 138 क्विंटल कापूस भरला. 
 
मात्र, मालमोटार गुजरात राज्यातील कढी येथे पोहोचलीच नाही. त्यासंदर्भात शेतकर्यांनी चालकाशी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो झाला नाही. अखेर ट्रान्स्पोर्टचे मालक खानुबेगवाला यांच्याशी संपर्क करुन, मालमोटार चालकाचा भ्रमणध्वनीवर संपर्क होत नसल्याचे सांगत, त्यांना चालकाच्या परवान्यासह मालकाशी संपर्क करावा, असे शेतकर्यांनी सांगितले. त्यानंतर खानुबेगवाला यांनी मालमोटार मालकाशी संपर्क केला. मालकाने आपली मालमोटार आपल्या भावनगरमधील निवासस्थानीच उभी असून, तीत कापसाचा माल भरला नसल्याचे कळविले. त्यामुळे खानुबेगवाला याने मालमोटारीची जबाबदारी घेऊन त्यावरील चालकाची कोणत्याही प्रकारे पडताळणी न करता संबंधित मालमोटार शेतकर्यांकडे पाठवून दिल्याचे स्पष्ट झाले.संबंधित मालमोटार चालकाने खोट्या क्रमांकाची पाटी लावत कापसाच्या मालाची कोठेतरी विल्हेवाट लावली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तिन्ही शेतकर्यांनी पारोळा येथील पोलीस ठाण्यात धाव घेत अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मालमोटार चालक, वाहतूकदार व्यावसायिक हसन रशीद खानुबेगवाला यांच्याविरुद्ध संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तीनही मंत्र्यांचा काळे फुगे सोडून आदिवासी कोळी समाजातर्फे निषेध