Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १०० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत

eknath shinde
, शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (20:57 IST)
गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १०० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. हा एक अनोखा विक्रम असून त्याबद्दल निधी कक्षाच्या टीमचे कौतुक करताना गरजू रुग्णांच्या मदतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा  समारोप झाला. विधानभवनातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात धर्मा सोनवणे यांना एक लाख रुपयांच्या वैद्यकीय मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. हे तेच धर्मा सोनवणे आहेत. ज्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईकडून ठाण्याला परतत असताना रस्त्याच्या कडेला एक रुग्णवाहिका उभी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ताफा थांबवून रुग्णाची विचारपूस केली..त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. मुख्यमंत्र्यांनी तेव्हा सोनवणे यांना केवळ रुग्णवाहिकाच दिली नव्हती तर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार देखील केले होते. या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आला त्याचाच एक लाखांचा धनादेश सोनवणे यांना देण्यात आला. त्यावेळी मला तुमच्यामुळे नवे आयुष्य मिळाल्याची भावना सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली.
 
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने गेल्या वर्षभरात १०० कोटींची मदत वितरित करण्याचा टप्पा सर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या कक्षाचे कौतुक केले. या कक्षाने केलेले अथक परिश्रम आणि रुग्णसेवेसाठी दाखवलेली तत्परता यामुळे हे साध्य झाल्याचे सांगत भविष्यातही गरजू रुग्णांना अशाच प्रकारे मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, निलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या टीम मध्ये काम करणारे सर्व वैद्यकीय सहाय्यक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या कक्षाचा वैद्यकीय मदतीचा आलेख कायम चढता राहिला असून यापूर्वी ५० तर आता १०० कोटी वैद्यकीय मदत देण्याचा टप्पा सर केल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णासाठी हा निधी कक्ष हा एक आशेचा किरण ठरला आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : पोलिस भरतीसाठी पळण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू