Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुरगाणा राक्षसभुवन येथे विवाह समारंभात पाहुण्यांना ११०० केशर आंबा रोपांची भेट

mango
, शनिवार, 21 मे 2022 (08:08 IST)
विवाह सोहळ्यातील अनिष्ट प्रथांना फाटा देत तालुक्यातील राक्षसभुवन येथील भुसारे परिवाराने व-हाडींना अकराशे आम्र वृक्षांची भेट देऊन निसर्ग संवर्धनाचा वसा जपल्याने वृक्ष प्रेमीनी भुसारे परिवाराचे अभिनंदन केले आहे. विवाह सोहळ्यात  कपडे, दागदागिने, अनावश्यक भेट वस्तू  एकमेकांना देऊन स्वागत केले जाते. त्यामुळे अनावश्यक खर्चाला फाटा देत पाहुण्यांना कायम स्मरणात राहावा यासाठी केशर आंब्याची अकराशे रोपं भेट म्हणून देण्यात येऊन वृक्ष तसेच फळझाडांचे संवर्धन करण्याचा संदेश दिला. फळझाडांचे वाटप करुन कमी खर्चात ह्या विवाह सोहळ्याचे मुख्य उद्दिष्ट राक्षसभुवन येथील जनार्दन भुसारे यांनी त्यांच्या लहान भाऊ व बहीण यांच्या विवाह समारंभात ठेवले होते. कुठल्याही प्रकारचा आहेर न स्विकारता बहिण व भावाकडील सासरच्या मंडळींना तसेच स्वकियांना गुजरात मधून आणलेली केशर आंब्याची ही रोपे भेट देऊन एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
 
दोन वर्षे राज्यावर कोरोनाचे  सावट होते. या दुष्काळात शेतकरी होरपळून निघाला होता. त्यातच मागील खरिपात त्यास अतिवृष्टीने झोडपले. रब्बी हंगामातील गारपीटीच्या माऱ्याने तर तो पार उध्वस्त झाला होता. हुंडा, कन्यादान सर्व भेटवस्तूंची देण्याची पडलेली प्रथा, मानापानाचे आहेर तसेच समाजाच्या दबावाखाली लग्न थाटामाटात करण्याच्या मानसिकतेमुळे हा खर्च प्रचंड वाढला आहे. प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीत बहुतांश शेतकरी कुटुंबांना लग्नाचा वाढता खर्च झेपावेनासा झाला आहे. त्यामुळे एक तर कर्जबाजारी होऊन अथवा शेतीचा तुकडा विकून लग्न सोहळा पार पाडला जातो.
 
लग्नसोहळ्यात अनिष्ट प्रथा अनावश्‍यक मानापानावर आता मर्यादा आणाव्या लागतील. अत्यंत आटोपशीर खर्चात हा सोहळा पार पाडणे हे शेतकरी कुटुंबास भविष्यात अधिक हिताचे ठरेल. दुर्गम भागातील राक्षसभुवन येथील भुसारे कुटुंबाने लग्नकार्यात कुठलाही आहेर किवा भेट वस्तु  स्विकारली नाही. उलट व-हाडी मंडळींना आम्र वृक्षांची भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जल परिषदेचे सदस्य देविदास कामडी, योगेश महाले,  हिरामण चौधरी, लक्ष्मण गायकवाड, संजय चव्हाण, हेमराज गावित आदी उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केतकी चितळेला आता अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलिस कोठडी