2014 च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानंतर पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकऱ्याच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा झाले असून त्यांना असे वाटत होते की पंतप्रधान मोदींनी जनधन खात्यात पैसे ठेवले आहेत. त्यातून नऊ लाख रुपये काढून त्यांनी घर केले. मोदींनी 15 लाख रुपये दिल्याची गावात चर्चा होती, मात्र सहा महिन्यानंतर दुसरेच दृष्य समोर आले.
पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्धन औटे यांच्या, बँक ऑफ बडौदाच्या खात्यावर १७ ऑगस्ट २०२१ ला १५ लाख ३४ हजार ६२४ रुपए जमा झाले. त्यामुळे मोदींने आपलं आश्वासन पूर्ण करत आपल्याला पैसे पाठवले, असं औटे यांना वाटलं. मोदींनी पाठवलेल्या पैश्याबद्दल अनेकांनी ज्ञानेश्वर यांचे अभिनंदन केलं. तर औटे यांनी पंतप्रधान कार्यालयाला मेल करत आभार मानले.
दुसरीकडे पिंपळवाडी ग्रामपंचायतला १५ व्या वित्त आयोगाचे जिल्हा परिषदेकडून मिळणारे पैसे खात्यावर आलेच नसल्याने चौकशी सुरू झाली. आणि हे पैसे औटे यांच्या खात्यावर जमा झाल्याची चूक ४ महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला लक्षात आली. आता ज्ञानेश्वर यांना ग्रामपंचायतीने पैसे परत करण्यासाठी पत्र पाठवले असून पैसे परत करण्यासाठी दबाव आणत आहे. तर खात्यात जमा झालेले पैसे आपल्याला मिळाल्याचे वाटल्यानेच आपण ते खर्च केले, आता उरलेले ६ लाख व खर्च केलेली रक्कम आपण बँकेला व ग्रामपंचायतीला हप्त्या-हप्त्याने परत करू असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.