हॉकी स्टेडियमयेथील कोव्हीड सेंटरमध्ये 16 लाख रुपयांची चोरी झाली. चोरटय़ांनी ऑक्सिजन कॉपर पाई, कॉपर वायर, स्विच, लिप्टचे साहित्य, खुच्या असे साहित्य लंपास केले. दरम्यान या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. सफाई कर्मचाऱयांच्या चाणाक्षपणामुळे हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, या बाबतची फिर्याद महापालीकेचे कनिष्ठ अभियंता महादेव गंगाधर फुलारी (वय ५० रा. विजयनगर, संभाजीनगर स्टँड नजीक) यांनी याबाबतची फिर्याद दिली. आकाश मुळे, कासिम शेख, सागर सुर्यवंशी, रोहीत कोकीतकर, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, हॉकी स्टेडियम समोर महापालीकेच्या इमारतीमध्ये महापालीकेचे कोव्हिड सेंटर आहे. जानेवारी महिन्यापासून हे कोव्हीडसेंटर बंद आहे. शनिवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास महापालीकेचे सफाई कर्मचारी हॉकी स्टेडियम परिसरात कचरा गोळा करत होते. यावेळी त्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड सेंटरमध्ये गोंधळ सुरु असल्याचा आवाज आला. त्यांनी आत मध्ये जावून पाहिले असता काही कोव्हिड सेंटरमधील साहित्य उचकटून चोरुन नेत असल्याचे दिसून आले. कर्मचाऱयांनी काही चोरटय़ांना पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले तर दोघांना पकडण्यात आली. सफाई कर्मचाऱयांनी या घटनेची माहिती प्रभागातील माजी नगरसेवक किरण नकाते यांना दिली. नकाते यांनी घटनास्थळी धाव घेवून याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला तर दोघा चोरटय़ांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधीक चौकशी सुरु असून त्यांनी आपल्या अन्य साथीदारांची नावे पोलीसांना दिली आहेत. तसेच जानेवारी महिन्यापासून या ठिकाणाहून चोरीची कबूली दिली.
सफाई कर्मचाऱयांचा चाणाक्षपणा
महापालीकेच्या सफाई कर्मचाऱयांमुळे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्यांच्या चाणाक्षपणामुळेच दोघा चोरटय़ांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. सफाई कर्मचारी वेळेत पोहोचल्यामुळे पुढील चोरी टळली.