Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वयाची शंभरी ओलांडलेले 2 लाख 489 हजार मतदार; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली ही माहिती

वयाची शंभरी ओलांडलेले 2 लाख 489 हजार मतदार; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली ही माहिती
, बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (15:08 IST)
पुणे –छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे मतदार जनजागृती सायकल फेरीचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले,देशातील दुर्गम भाग, वाळवंट, समुद्रकिनारा, दऱ्याखोऱ्यातील नागरिक मतदानात सहभाग घेतात हे आपले वैशिष्ठ्य आहे. देशात वयाची शंभरी ओलांडलेले २ लाख ४८९ हजार मतदार आहेत. हिमाचल प्रदेशच्या शामशरण नेगी यांनी मृत्यूपूर्वी ३ दिवस आधी टपाली मतदान केले.
 
मतदानाविषयी ही जागरूकता आणण्यासाठी सर्वांनी मतदार जागृतीच्या कार्यात सहभागी व्हावे, निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावावा आणि निवडणूक आयोगाचे दूत म्हणून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. आजची जनजागृती फेरी सर्वसमावेशक असल्याचे नमूद करून या फेरीत खेळाडू, कलाकार, युवक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी मतदारही सहभागी होत आहेत असेही ते म्हणाले. देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे. शहरी भागात मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुण्यातून होत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
 
यावेळी निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, दिग्दर्शक नागराज मंजुळे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, निवडणूक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, स्वीप संचालक संतोष अजमेरा आदी उपस्थित होते.
 
लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी
मतदार नोंदणी करावी -निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे
निवडणुक आयुक्त श्री.पांडे म्हणाले, या वेळेचा मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम युवा मतदार केंद्रीत ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत १७ वर्षाचा युवकही नोंदणी करू शकणार आहे. १८ वर्ष पूर्ण होताच त्याचा समावेश मतदार यादीत केला जाईल. लोकशाही सशक्त करण्यासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी आणि सायकलच्या चाकाच्या गतीप्रमाणे मतदार जनजागृतीचा संदेश प्रत्येक भागात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री.मंजुळे यांनी सायकल फेरीला शुभेच्छा देताना युवा मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन केले. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे ते म्हणाले.
 
यावेळी दिलेल्या संदेशात मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, शहरी भागातील १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करुन मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेणे तसेच मतदार यादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक गावात १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन, नवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यालयामध्ये जनजागृती मोहीम आयोजित करुन १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची नोंदणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
युवा मतदार सार्थक पडाळे, तृतीयपंथी समुदायातील मतदार सानवी जेठवानी, अमित मोहिते, ज्येष्ठ नागरिक आनंद पडाळे, दिव्यांग मतदार शिवाजी भेगडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल फेरीचा शुभारंभ केला. सायकल फेरीच्या शुभारंभ प्रसंगी बॅडमिंटन खेळाडू निखिल कानिटकर, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू अभिजित कुंटे, बॉक्सिंग ऑलिंपियन मनोज पिंगळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुमेश झेपे, एव्हरेस्ट शिखर वीर आशिष माने, आनंद माळी, हॉकी खेळाडू अजित लाखा, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, सायकलिंग ऑलिंपियन मिलिंद झोडगे उपस्थित होते. सायकल फेरीत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, युवा मतदार, ज्येष्ठ नागरीक, तृतीयपंथी समुदायाचे प्रतिनिधी, अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सुमारे ४०० नागरिकांनी सहभाग घेतला.
 
राधा चौक- पुणे विद्यापीठ चौक- राजभवन-केंद्रीय विद्यालय समोरून- कस्तुरबा वसाहत- ब्रेमेन चौक- परिहार चौक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- मेरी पॉईंट हॉस्पिटल- ताम्हाणे चौक- ज्युपिटर हॉस्पिटल- बाणेर बालेवाडी फाटामार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे सायकल फेरीचा समारोप झाला.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ