Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gadchiroli Encounter मध्ये 26 कथित नक्षलवादी ठार, कशी झाली कारवाई?

Gadchiroli Encounter मध्ये 26 कथित नक्षलवादी ठार, कशी झाली कारवाई?
, रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (10:33 IST)
प्रवीण मुधोळकर
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटगूल-ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत 26 माओवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.
 
या दरम्यान माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाच्या C-60 चे चार जवान जखमी झाले आहेत. चारही जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे हलविण्यात आलं आहे.
 
रविंद्र नैताम (वय 42), सर्वेश्वर आत्राम (वय 34), महरु कुळमेथे (वय 34) आणि टीकाराम कटांगे (वय 41) अशी जखमी जवानांची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेबाबत बीबीसी मराठीला अधिक माहिती देताना गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, "आम्ही घटनास्थळावरून 26 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख रविवारी सकाळीच होऊ शकेल."
 
जखमी जवानांना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इंस्टिट्युट मध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत, असं ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इंस्टिट्युटचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले. "चारही जवानांना बंदुकीच्या गोळ्या लागल्यामुळे त्यांच्या शरिराला त्याची इजा झाली आहे. आमच्या रुग्णालयातील एमर्जन्सी विभागातील सहकाऱ्यांनाी शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता या चार जखमी जवानांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हॉस्पिटलमध्ये आणलं."
 
"चारही जवानांवर Critical Care Unit मध्ये उपचार सुरू असून चोवीस तास त्यांच्या उपचारासाठी विशेषज्ज्ञ उपलब्ध आहेत." असंही डॉ. अनुप मरार यांनी सांगितलं.
 
सर्वाधिक काळ चाललेली कारवाई
शनिवारी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेली चकमक ही माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक काळ चाललेली चकमक ठरली, असं म्हटलं जात आहे.
 
शनिवारी सकाळी 6 वाजता सुरू झालेली चकमक ही दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होती. गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष प्रशिक्षित C-60 कमांडोजच्या 100 जवानांनी या चकमकीत माओवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं.
या 100 कमांडोजच्या मदतीला C-60 कमांडोजच्या च्या आणखी 16 पार्टीज म्हणजेच 500 जवानांची अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माओवादी हे धानोरा तालुक्यातील कोटगूल-ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात लपून बसले असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. माओवाद्यांच्या या दलामध्ये कोची दलमचे माओवादी असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
CPI (Maoist) या प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या गडचिरोली डिविजनल कमिटीचा मेंबर सुखलाल या दलमचे नेतृत्व करत असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. पण माओवाद्यांसोबत चकमक सुरू झाल्यानंतर इतरही काही दलमचे माओवादी याच ठिकाणी असल्याचं गडचिरोली पोलिसांच्या C-60 कमांडोजच्या लक्षात आलं.
माओवाद्यांनी C-60 कमांडोजवर गोळीबार सुरू ठेवला. त्यामुळे दुपारी 4 वाजेपर्यंत ही चकमक सुरुच होती. 26 माओवाद्यांना ठार करण्याची ही चकमक इतिहासातील दुसरी मोठी अशी ठरली आहे.
 
23 एप्रिल 2018 रोजी गडचिरोली पोलिसांच्या C-60 कमांडोजनी 40 माओवादयांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमकीत ठार केले होते.
 
एटापल्ली तालुक्यातील बोरिया-कसनसुर येथए 34 माओवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. तर सहा माओवाद्यांना अहेरी तालुक्यात ठार करण्यात आलं होतं.
 
अद्याप कुणाचीही ओळख पटलेली नाही
शनिवारी झालेल्या चकमकीत CPI (Maoist) सेंट्रल कमिटीचा एक बडा नेता ठार झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावर
 
गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी बीबीसी मराठीला सांगितले की "मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह रविवारी सकाळी गडचिरोली येथे आणल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल. त्यानंतरच या चकमकीत कोणकोणते माओवादी ठार झाले हे सांगता येईल."
 
पोलिसांच्या हाती टिप आली अन्
सुरुवातीला धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात काही माओवादी हालचाल सुरू असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
 
त्यानंतर पोलिसांनी त्या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याच वेळी जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या कथित नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.
 
त्यानंतर पोलिसांनीही माओवाद्यांना प्रत्युत्तर दिलं. गडचिरोली पोलिसांनी आपलं नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करून अधिक जवानांची कुमक घटनास्थळी पाठवली.
 
या कारवाईदरम्यान माओवाद्यांनी मृत पावलेल्या माओवाद्यांचे मृतदेह सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता.
 
पूर्वाश्रमीच्या माओवाद्यांना ओळख पटवण्यासाठी बोलवले
गडचिरोली पोलिसांनी नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या राकेश नावाच्या पूर्वाश्रमीच्या माओवाद्याला 26 मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आणले आहे.
 
आणखीही काही आत्मसमर्पित माओवाद्यांकडूनही मृतदेहाची ओळख पटवली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
पोलिसांनी यानंतर आता जंगलातलं सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केलं आहे. ग्यारापत्तीच्या जंगलातून या कारवाईच्या वेळेस पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PMAY ग्रामीण योजनेचा पहिला हप्ता आज देणार, 700 कोटींची तरतूद