Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ
, शनिवार, 24 जून 2023 (22:06 IST)
अमरावती भारत हा तरुणांचा देश आहे. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहते. त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करतानाच, विद्यापीठाने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य निर्माण करावे, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या हस्ते येथील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षान्त समारंभात २४९ संशोधकांना आचार्य पदवी, ११९ गुणवंतांना सुवर्णपदके, २३ रौप्यपदके आणि २५ रोख पारितोषिके तसेच ४६ हजार १४४ विद्यार्थ्यांना पदवी व २३६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
 
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाकडून प्रक्रिया होत असल्याबाबत राज्यपाल श्री. बैस यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, येत्या काळातील विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून त्यानुरूप विद्यार्थ्यांत कौशल्य विकास घडविण्यासाठी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधक व व्यावसायिकांची पिढी यातून घडेल. विद्यार्थ्यांनी केवळ ‘नोकरी शोधणारे’ न होता ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ बनावे अशा उद्यमशीलतेचा विकास या धोरणातून होईल.
नैतिक मूल्यांचे वर्धन व संस्कृतीचे आकलन वाढविण्यासाठीही धोरण उपयुक्त आहे. धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आधुनिक शिक्षणाच्या नव्या पर्वाचा आरंभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा पुरस्कार केला. खऱ्या अर्थाने ते स्वच्छ भारत अभियानाचे जनक आहेत. त्यांच्या नावे स्थापित विद्यापीठाने राज्यात सर्वात स्वच्छ महाविद्यालये व स्वच्छ विद्यापीठाचे उदाहरण निर्माण करावे. संत गाडगेबाबा यांनी समाजाला अंत्योदयासाठी ‘दशसूत्री’ दिली. आम्हा सर्वांसाठी ती मार्गदर्शक आहे.
विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे ‘नॅक मूल्यांकन’ करून घ्यावे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने योगदान द्यावे. किमान दहा गावे दत्तक घेऊन तिथे परिवर्तनासाठी प्रयत्न करावेत. या कामात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे  जेणेकरून त्यांच्यात वास्तव व सामाजिक परिस्थितीबद्दलची जाणीव विकसित होईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.
समारंभापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे राज्यपालांना पोलीसांतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी , पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन आदींनी स्वागत केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही