ठाणे जिह्यातील भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी मंदिरावरील दरोड्याचा प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दरोड्यातील २ लाख ८३ हजार ३६ रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.
भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर महाराष्ट्रातील एक प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. लाखो भाविक मंदिराला भेट देऊन नवस बोलत असतात. १० मे रोजी पहाटे ३.१० वाजता वज्रेश्वरी मंदिराच्या मागील बाजूने ५ दरोडेखोरांनी प्रवेश करत मंदिराच्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय वायरने बांधून दानपेट्या फोडून ७ लाख १० हजारापेक्षा अधिक रक्कम चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकाने दरोड्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱयाने दिलेल्या माहितीच्या आधारे दादरा नगर हवेली, जव्हार आणि शहापूर येथून ५ जणांना ताब्यात घेतले. गोविंद गिंभल (जव्हार, पालघर), विनीत चिमडा (अघई, शहापूर), भारत वाघ (अघई, शहापूर), जगदीश नावतरे (अघई, शहापूर), प्रविण नावतरे (अघई, शहापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस तपासात अजून तिघांनी त्यांना मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने तिन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. अटक केलेले आरोपी हे १९ ते २६ आणि एक आरोपी ३५ वर्षे वयाचा आहे.